
कोकणातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र मार्लेश्वर येथे भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि तातडीच्या संपर्कासाठी ‘भारत नेट’ सुविधा उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, यात्रा संपून गेल्यानंतरही या ठिकाणी नेटवर्कची कोणतीही सुविधा उपलब्ध झालेली नाही. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे आजही येथे येणाऱ्या लाखो भाविकांना नेटवर्कअभावी अडचणींचा सामना करावा लागत आहे.
श्री क्षेत्र मार्लेश्वर हे ठिकाण डोंगरदऱ्यांत आणि घनदाट जंगलात वसलेले आहे. या भौगोलिक परिस्थितीमुळे हे क्षेत्र दरड कोसळणे आणि भूकंपप्रवण क्षेत्रात मोडते. याच पार्श्वभूमीवर, १२ ते १५ जानेवारी २०२६ या कालावधीत भरलेल्या वार्षिक यात्रेदरम्यान कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने मदत कार्य राबवता यावे, यासाठी मोबाईल नेटवर्क असणे अत्यंत आवश्यक होते.
या सुविधेसाठी मारळ-निवधे ग्रुप ग्रामपंचायतीने २९ डिसेंबर २०२५ रोजी पत्राद्वारे मागणी केली होती. ग्रामपंचायतीच्या या मागणीची दखल घेत रत्नागिरीचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष मनुज जिंदल यांनी ३० डिसेंबर २०२५ रोजी भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेडला पत्र लिहून १० जानेवारी २०२६ पासून या ठिकाणी सेवा कार्यान्वित करण्याचे आदेश दिले होते. मात्र, या आदेशाकडे संबंधित विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
विशेष म्हणजे, मार्लेश्वर येथे बीएसएनएल कंपनीचा मनोरा उभा आहे, परंतु प्रत्यक्षात तेथे कोणतीही सेवा कार्यान्वित नाही. यात्रेचा मुख्य काळ संपला असला तरी, सध्याही या पर्यटनस्थळी आणि तीर्थक्षेत्रावर पर्यटकांची आणि भाविकांची मोठी गर्दी असते. डोंगरदऱ्यांत ५२० पायऱ्या चढून जाताना भाविकांना नेटवर्कअभावी आपल्या सहकाऱ्यांशी संपर्क साधणेही कठीण होते. एखाद्या दुर्घटनेच्या वेळी संपर्क कसा साधायचा, असा गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहे.
मार्लेश्वरला दरवर्षी लाखो भाविक येतात, पण मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे कोणाशीच संपर्क होत नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊनही जर नेटवर्क मिळत नसेल, तर कठीण आहे. आपण या बाबत प्रशासनासह मंत्री, खासदार, आमदार यांना निवेदन दिली आहेत. सध्या टॉवर आहे पण शो चा आहे.
– रुपेश सावंत, स्थानिक ग्रामस्थ मारळ



























































