
संगमेश्वर तालुक्यातील भडकंबा गावात ‘जल जीवन मिशन’ योजनेचा अक्षरशः बोजवारा उडाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. योजना सुरू होऊन तब्बल तीन वर्षे उलटून गेली, मोठ्या धुमधडाक्यात भूमिपूजन झाले, कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला; मात्र प्रत्यक्षात एकही काम पूर्णत्वास गेले नसल्याने ग्रामस्थ आणि मुंबई मंडळ आता आंदोलनाच्या तयारीत आहेत.
या योजनेअंतर्गत मोरेवाडी, पाकतेकरवाडी, नवलेवाडी, बाईतवाडी, दत्तवाडी, बेर्डेवाडी, पाष्टेवाडी, बौद्धवाडी तसेच पुनर्वसित गावांमध्ये विविध कामे हाती घेण्यात आली होती. नदीवरील तीन पक्के बंधारे उभारणे, तसेच आवश्यक ठिकाणी बोरवेल खोदणे अशी कामे सुरू करण्यात आली; मात्र आजतागायत एकही काम पूर्ण झालेले नाही. ठेकेदाराचे साईटवरील दुर्लक्ष आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचा वचक नसल्याने कामे रखडल्याचा आरोप होत आहे.
विशेष म्हणजे मार्च महिना संपून एप्रिल अर्धा उलटला तरी यावर्षी कामाला सुरुवात झालेली नाही. मागील वर्षी सोंबा मंदिराजवळ सुरू केलेला बंधारा पावसामुळे अर्धवट राहिला. दरवर्षी पावसाळा जवळ आला कीच नदीतील कामे सुरू केली जातात, असा आरोप ग्रामस्थ करत आहेत.
योजनेअंतर्गत टाकण्यात आलेले पाईप जमिनीत योग्य पद्धतीने पुरले गेले नाहीत. ज्या ठिकाणी कातळ किंवा मोठे दगड आहेत, तेथे सिमेंटने बांधणी करणे अपेक्षित होते. मात्र पाईप उघड्यावर टाकल्याने काही दिवसांपूर्वी लागलेल्या वनव्यात ते जळून गेले. परिणामी मोरेवाडी आणि पाकतेकरवाडी येथील ग्रामस्थांना चार-पाच दिवसांपासून पाण्याविना राहावे लागले असून पाणी टॅंकरने विकत आणण्याची वेळ आली आहे.
योजना सुरू होऊन तीन वर्षे उलटून गेली, तरी एकही काम पूर्ण झाले नाही. “वेळेत काम पूर्ण होत नसेल तर अशा ठेकेदारांचा उपयोग काय?” असा सवाल संतप्त ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. पाणी आणि रस्त्यासारख्या मूलभूत सुविधांचा प्रश्न गेली अनेक वर्षे वाड्या-वस्त्यांवर कायम आहे. दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात टॅंकरवर अवलंबून राहण्याची वेळ येते. “किती त्रास सहन करायचा?” असा प्रश्नही ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
या सततच्या दिरंगाईमुळे नागरिकांचा संयम सुटत असून लवकरच तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा श्री केदारलिंग ग्राम विकास मंडळ, मुंबईचे सचिव महेंद्र मोरे यांनी दिला आहे. विकासकामांतील चालढकल आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात ग्रामस्थ आता रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत.

























































