
पाकिस्तानमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चा अयशस्वी झाल्याने डोनाल्ड ट्रम्प प्रचंड संतापले आहेत. त्यांनी इराणला अश्मयुगात पाठवण्याची धमकी पुन्हा दिली आहे. ट्रम्प यांनी इराणला अश्मयुगात पाठवण्याचा इशारा पुन्हा एकदा दिला आहे. करार होवो वा न होवो, आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही आधीच जिंकलो आहोत, असा दावाही ट्रम्प यांनी केला आहे.
ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर केली आहे. त्यात म्हटले आहे की, अयशस्वी चर्चेनंतर आता आमच्याकडे इराणवर नौदल नाकेबंदी लादण्याचा पर्याय आहे. आमच्याकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, असे सांगत ट्रम्प यांनी इराणला पुन्हा अश्मयुगात पाठवण्याची धमकीही दिली आहे. अमेरिका आता व्हेनेझुएलाप्रमाणे इराणवर आर्थिक नाकेबंदी लादू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
लेक्सिंग्टन इन्स्टिट्यूटमधील सुरक्षा तज्ज्ञ रेबेका ग्रँट यांच्या मते, आता अमेरिकी नौदलाला होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नियंत्रण ठेवणे खूप सोपे जाईल. त्यांनी सांगितले की, गेल्या २४ तासांत एका रशियन टँकरसह सुमारे १० जहाजे या सामुद्रधुनीतून ये-जा करताना दिसली आहेत. त्यांनी पुढे असेही सांगितले की, जर इराणने आपला हट्ट कायम ठेवला, तर अमेरिकी नौदल पाळत वाढवेल. अशा परिस्थितीत, खार्ग बेट किंवा ओमानजवळील अरुंद मार्गातून जाण्यासाठी अमेरिकी नौदलाची परवानगी घ्यावी लागेल. त्यामुळे आता शांतता चर्चा अशस्वी झाल्यानंतर अमेरिका आणि इराण नेमका काय निर्णय घेणार, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.


























































