US-Israel-Iran War – युद्धात ३,३७५ जणांचा मृत्यू, इराणकडून अधिकृत आकडेवारी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या भीषण संघर्षात आतापर्यंत ३,३७५ लोक मारले गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इराणच्या फॉरेन्सिक मेडिसिन ऑर्गनायझेशनचे प्रमुख अब्बास मस्जेदी अराणी यांनी ही अधिकृत आकडेवारी जाहीर केली असून ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

अब्बास मस्जेदी अराणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणमधील फॉरेन्सिक तज्ज्ञांनी आतापर्यंत ३,३७५ मृतदेहांची ओळख पटवली आहे. यामध्ये २,८७५ पुरुष आणि ५०० महिलांचा समावेश आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या लष्करी कारवायांमध्ये ही जीवितहानी झाल्याचे ते म्हणाले आहेत.

२१ तासांच्या चर्चेनंतरही डेडलॉक कायम

दरम्यान, अमेरिका आणि इराण यांच्यात शांततेसाठी पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये सुरू असलेल्या चर्चेत कोणतीही प्रगती होऊ शकलेली नाही. तब्बल २१ तास चाललेली ही उच्चस्तरीय चर्चा कोणत्याही कराराविना संपली. अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हॅन्स यांनी सांगितले की, “आम्ही आमची अंतिम ऑफर इराणसमोर ठेवली होती, परंतु त्यांनी अण्वस्त्रांबाबतच्या दीर्घकालीन अटी मान्य करण्यास नकार दिला.”

एकमेकांवर आरोपांच्या फैरी

या चर्चेच्या अपयशानंतर दोन्ही देशांनी एकमेकांवर दोषारोप केले आहेत. अमेरिकेने इराणच्या अण्वस्त्र महत्त्वाकांक्षेवर बोट ठेवले, तर इराणने अमेरिकेच्या मागण्या बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. अण्वस्त्र अधिकार आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ यांसारख्या कळीच्या मुद्द्यांवरून दोन्ही देशांमधील मतभेद कायम आहेत. तूर्तास पुन्हा चर्चेची कोणतीही शक्यता नसल्याचे इराणने स्पष्ट केले आहे.