कॅनेडाचा अमेरिकेला दणका! अमेरिकेला जाणारा मोठा निधी रोखला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कॅनेडाचे नवे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी एक मोठी घोषणा करत अमेरिकेला आर्थिक धक्का दिला आहे. कॅनेडाच्या संरक्षण बजेटचा ७० टक्के हिस्सा आतापर्यंत अमेरिकेला जात होता, मात्र आता हा निधी अमेरिकेला न देता तो कॅनेडाच्या विकासकामांसाठी आणि तेथील स्थानिक कंपन्यांवर खर्च केला जाईल, असा निर्णय पंतप्रधान कार्नी यांनी घेतला आहे.

‘आज तक’च्या वृत्तानुसार, पंतप्रधान कार्नी यांनी आता बाय कॅनेडियन’ (कॅनेडियन वस्तू खरेदी करा) हे नवे धोरण स्वीकारले आहे. यानुसार, जेव्हा जेव्हा कॅनडाचे केंद्र सरकार कोणत्याही वस्तूची खरेदी अथवा गुंतवणूक करेल, तेव्हा सर्वात आधी कॅनेडियन कंपन्या आणि सप्लायर्सना प्राधान्य दिले जाईल. यामुळे आतापर्यंत अमेरिकन कंपन्यांना मिळणारा मोठा आर्थिक फायदा आता बंद होणार आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनेडावर विविध प्रकारचे टॅरिफ लादले असून कॅनेडाबाबत अनेकवेळा वादग्रस्त विधाने केली होती. या पार्श्वभूमीवर कॅनेडा आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढला आहे. ट्रम्प यांच्या कृतीला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आणि आपल्या देशाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी पंतप्रधान कार्नी यांनी हा कठोर निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

अमेरिकन कंपन्यांना मोठा फटका

दरम्यान, कॅनेडा आतापर्यंत आपल्या संरक्षण बजेटमधील प्रत्येक १ डॉलरपैकी ७० सेंट्स अमेरिकन कंपन्यांना देत होता. शस्त्रे, जहाजे, मिसाइल्स आणि इतर लष्करी साहित्यासाठी अमेरिकन कंपन्यांना मिळणारे करोडो डॉलर्सचे ऑर्डर्स आता थांबणार आहेत. संरक्षण बजेटचा हा मोठा हिस्सा रोखला गेल्यामुळे अमेरिकेतील बड्या संरक्षण कंपन्यांना मोठा झटका बसला आहे. या निर्णयामुळे कॅनेडा आणि अमेरिका यांच्यातील आधीच ताणलेले संबंध अधिक बिघडण्याची शक्यता असून, कॅनेडाने आता अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.