
अमेरिका-इस्रायल इराण युद्ध आणि त्यांच्यातील दोन आठवड्यांची शस्त्रसंधी याचा परिणाम सोन्याचांदीच्या किमतीवरही झाला आहे. या अस्थिरतेच्या काळात सोनेचांदीत जबरदस्त चढउतार होत आहे. मात्र, या आठवड्यात शस्त्रसंधीची बातमी आल्याने सोनेचांदीने चांगलीच तेजी दाखवली आहे.
या आठवड्यात सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सोन्याचा भाव सुमारे ३,००० रुपये आणि चांदीचा भाव १०,५०० रुपयांनी वाढली आहे. देशांतर्गत वायदे बाजारात सोने आणि चांदीच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. एमसीएक्सच्या आकडेवारीनुसार आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,४९,६५० रुपये, तर चांदीचा दर २,३२,६०० रुपये प्रति किलोवर बंद झाला. एका आठवड्यात सोन्याचा दर सुमारे ३,००० रुपये आणि चांदीचा दर सुमारे १०,५०० रुपयांनी वाढला आहे.
सराफा बाजारातही सोन्याच्या किमती वधारल्या आहेत. मुंबईत २४ कॅरेटचे शुद्ध सोने १,५२,८४० रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. २२ कॅरेट सोने १,४०,१०० रुपये प्रती 10 ग्रॅम तर १८ कॅरेट सोने १,१४,६३० रुपये प्रती 10 ग्रॅम आहे. आता आगामी काळात अक्षय्य तृतीया सण येत आहे. तसेच लग्नसराईला सुरुवात देखील होणार आहे. त्यामुळे या काळात सोनेचांदीत तेजी राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.


























































