
राज्यभर खळबळ उडालेल्या नाशिकमधील अशोक खरात तसेच ऋषीकेश वैद्य प्रकरण ताजे असतानाच एका भोंदूने दैवीशक्तीचा संचार असल्याची बतावणी करू महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. कौटुंबिक वादात तोडगा काढण्याचे आमिष दाखवून भोंदूने महिलेवर बलात्कार केला तसेच 50 लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी भोंदूविरुद्ध स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. औदुंबर मनोहर गडदे (वय 43, रा. तरटगाव, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत 42 वर्षीय महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे पतीशी पटत नव्हते. त्यांच्यात कौटुंबिक वाद झाल्याने ती वेगळी राहत होते. महिलेची पाच वर्षांपूर्वी एकामार्फत भोंदू गडदे याच्याशी ओळख झाली. तेव्हा गडदेने देवऋषी असल्याची बतावणी महिलेकडे केली. माझ्या अंगात दैवीशक्तीचा संचार आहे, अशी बतावणी त्याने केली. कौटुंबिक समस्या दूर करतो, असे सांगून त्याने महिलेला जाळ्यात ओढले. त्याने महिलेला स्वारगेट परिसरातील एका लॉजवर बोलावून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने महिलेला माणगाव परिसरात बोलावून तेथील एका लॉजवर बलात्कार केला.
महिलेला नोकरी तसेच बांधकाम व्यवसायात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून आरोपी गडदेने तिच्याकडून वेळोवेळी 50 लाख 55 हजार रुपयांची फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत. दरम्यान, दैवीशक्तीचा संचार असल्याची बतावणी करून पुण्यातील महिलेवर बलात्कार केल्या प्रकरणी ऋषीकेश श्रीकांत वैद्य (वय 39, रा. वसई, जि. पालघर) याला अटक करण्यात आली होती.





























































