
शाळांची उन्हाळी सुट्टी सुरू होताच कोकणातील गावी जाण्याचे प्लॅनिंग मुंबईकर करीत आहेत. मात्र कोकणात जाण्यासाठी पुरेशा विशेष ट्रेन नाहीत. त्यात एसटीने 10 टक्के भाडेवाढ केल्यामुळे ‘लालपरी’चा प्रवास महागडा झाला आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱया मुंबईकरांचे उन्हाळी सुट्टीचे प्लॅनिंग अडचणीत सापडले आहे. रेल्वे आणि एसटी हे दोन्ही पर्याय उपयोगी येत नसल्यामुळे गावच्या प्रवासाचा बेत टांगणीला लागला आहे.
उन्हाळी सुट्टीत मुंबई-ठाण्यातून लाखो प्रवाशी कोकणातील गावी जातात. दरवर्षी प्रवाशांची संख्या अधिक असूनही रेल्वेकडून यंदाही पुरेशा प्रमाणात विशेष ट्रेनची व्यवस्था करण्यात आलेली नाही. उन्हाळी प्रवाशी गर्दीसाठी 1500 विशेष फेऱयांचे नियोजन करणाऱया मध्य रेल्वेने कोकणसाठी केवळ 36 फेऱयांची घोषणा केली. एकीकडे रेल्वेकडून निराशा झाली म्हणून अनेक मुंबईकरांनी एसटी प्रवासाचे नियोजन केले. मात्र या नियोजनात 10 टक्क्यांच्या हंगामी भाडेवाढीने खोडा घातला आणि एसटी प्रवासाच्या नियोजनातही मुंबईकरांचा हिरमोड झाला. एसटी महामंडळाने साध्या बस गाडय़ांची दरवाढ केली. त्यामुळे कोकणात जाणाऱया प्रवाशांना मुंबई-रत्नागिरीसाठी 666 रुपये, मुंबई-चिपळूणसाठी 500 रुपये अशी वाढीव रक्कम मोजावी लागणार आहे. हे वाढीव पैसे मोजण्याबरोबरच अर्धवट काम झालेल्या मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करावा लागेल म्हणून अनेकांनी एसटीचा पर्याय मागे टाकला आहे. कोकण रेल्वे मार्गावरील नियमित रेल्वे गाडय़ांचे तिकीट कोकणात जाणाऱया फार कमी प्रवाशांना मिळाल्याची नाराजी व्यक्त होत आहे.
रत्नागिरी, सावंतवाडीसाठी विशेष ट्रेन सोडण्याची मागणी
कोकण रेल्वे मार्गावरील बहुतांश गाडय़ा मडगावला जातात. त्यामुळे त्या गाडय़ांमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या प्रवाशांना बसायला जागाच मिळत नाही. ही गैरसोय दूर करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने रत्नागिरी आणि सावंतवाडीपर्यंतच धावणाऱया विशेष गाडय़ांची व्यवस्था केली पाहिजे, अशी प्रतिक्रिया सागर तळवडेकर यांनी दिली, तर कोकणच्या प्रवाशांना रेल्वेकडून कायम सापत्नभावाची वागणूक मिळत असल्याची नाराजी बळीराम राणे यांनी व्यक्त केली.

























































