15 कंत्राटी शिक्षक, कर्मचाऱ्यांना नारळ, जव्हारमधील 230 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जव्हार तालुक्यातील गोरठण या गावात असलेल्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील पंधरा कंत्राटी शिक्षक व कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात आला आहे. त्यांना कामावरून कमी करण्याच्या नोटिसा बजावल्याने या शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली असून 230 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात सापडले आहे. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या प्रकल्प संचालकांनी पंधराजणांच्या सेवा समाप्तीबाबत पालघर जिल्हा परिषदेला पत्र दिले आहे. त्यामुळे कुटुंबाचा चरितार्थ कसा चालवायचा या चिंतेने शिक्षकांना ग्रासले आहे.

आदिवासीबहुल तालुका असलेल्या जव्हारमधील वाड्यावस्त्यांपर्यंत राहणाऱ्या मुला-मुलींना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी समग्र शिक्षा अभियान सुरू करण्यात आले आहे. पण सध्या ते ठप्प झाले आहे. या अभियानांतर्गत कस्तुरबा गांधी बालि का विद्यालयात 11 शिक्षक व चार कर्मचारी 20 ते 22 वर्षांपासून काम करत होते. अचानक त्यांना सेवा समाप्तीच्या नोटिसा बजावल्या आहेत. याचा फटका अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर आणि उपेक्षित कुटुंबातील 230 विद्यार्थ्यांना बसणार आहे.

भवितव्यावर प्रश्नचिन्ह

जव्हार तालुक्यातील 230 गरीब आणि गरजू विद्यार्थिनी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात शिक्षण घेतात. त्यात पाचवी ते दहावीपर्यंतच्या मुलींचा समावेश आहे. या शाळांमध्ये 15 शिक्षक व कर्मचारी कार्यरत आहेत. अभियान बंद झाल्यास या मुलींच्या निवासाची आणि शिक्षणाची सोय कोलमडणार असून त्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

20 हून अधिक वर्षे सेवा बजावली

सर्व शिक्षा अभियान 2003 साली सुरू झाले. त्याचे नामांतर नंतर समग्र शिक्षा अभियान असे केले गेले. या अभियानांतर्गत डेटा एण्ट्री ऑपरेटर, विशेष शिक्षक, कनिष्ठ सहाय्यक, गृहपाल, लेखापाल आणि समन्वयक या विविध पदांवर कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत. 20 ते 23 वर्षे त्यांनी सेवा बजावली. मात्र आता त्यांच्यावर नोकरी सोडण्याची वेळ आली आहे.

कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीबाबत जी नोटीस आली आहे त्याकरिता शिक्षण विभागाकडून माहिती घेऊन वरिष्ठ कार्यालयास कळवले जाईल.
अक्षय पगार, गटविकास अधिकारी, जव्हार