
रोहा नगरपालिकेच्या कर वसुलीचे घोडे यंदा ७० टक्क्यांवर अडले आहे. त्यामुळे त्याचा मोठा परिणाम शहरातील विकासकामांवर होणार आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदा कर वसुली ४ टक्क्यांची घसरल्यामुळे प्रशासनाच्या कारभारावर टीकेची झोड उठली आहे. गॅलेक्सी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आणि प्रायमा डेव्हलपर्ससह आठ मोठ्या संस्थांकडे सुमारे ७० टक्के थकबाकी आहे.
सामान्य नागरिकांकडून वेळेवर कर वसूल करण्यात तत्पर असलेली नगरपालिका मोठ्या थकबाकीदारांसमोर मात्र हात टेकत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. शहरातील नामांकित ‘गॅलेक्सी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल’ने मिळकत कर व इमारत भाडे मिळून तब्बल १७ लाख रुपये थकवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. लाखोंची उलाढाल करणाऱ्या या संस्थेकडून कर वसुली करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याने संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान मालमत्तांचे फेरमूल्यांकन करून कर वाढवण्यात आला, त्याचा फटका सर्वसामान्यांना बसला.
डोकेदुखी थकबाकीदार
नगरपालिकेला डोकेदुखी ठरलेल्या थकबाकीदारांमध्ये गॅलेक्सी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल (१७ लाख), प्रायमा डेव्हलपर्स (१२ लाख), जीटीएल इन्फ्रा मोबाईल टॉवर (११.५६ लाख), अल्टिअस डिजिटल इन्फ्रा (१०.२१ लाख), इंडस टॉवर (७.८९ लाख), रोहा प्राईम स्क्वेअर (५.२३ लाख), रफिक शेख (३.४४ लाख), रिषभ बिल्डर्स (२.२६ लाख) आदींचा समावेश आहे.
मोबाईल टॉवरच्या कर वसुलीवर शासन निर्बंध असल्याने सुमारे ३५ लाख रुपये अडकून पडले आहेत. शासकीय इमारतींचा मालमत्ताकर उशिराने जमा होत असल्यामुळे टक्केवारी घसरल्याचे दिसून येत आहे, अशी प्रतिक्रिया रोहा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजयकुमार एडके यांनी व्यक्त केली आहे




























































