डोंबिवलीत पुस्तक आदान-प्रदान उपक्रम, २२ हजार पुस्तकांतून साकारले ‘सेल्युलर जेल’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुस्तके, मग ती कोणत्याही भाषेतील असोत, वाचकाच्या आयुष्याला नवी उभारी देतात. ज्ञानाचा हा साठा मिळवण्यासाठी सांस्कृतिक नगरी डोंबिवलीत पुस्तक आदान-प्रदान उपक्रम सुरू करण्यात आला आहे. शिवमंदिराजवळील सी.पी. गोयंका शाळेत २२ हजार पुस्तकांतून सेल्युलर जेलच्या प्रवेशद्वाराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.

पै फेंड्स लायब्ररी यांच्या वतीने आयोजित केलेल्या पुस्तक आदान-प्रदान या उपक्रमाची सुरुवात झाली असून हा उपक्रम १४ एप्रिलपर्यंत चालणार आहे. वाचकांनी आपल्या घरातील जुनी पुस्तके आणायची आणि त्याच वजनाच्या नव्या किंवा न वाचलेल्या पुस्तकांची मोफत देवाण-घेवाण करायची, अशी या उपक्रमाची संकल्पना आहे. यंदा उभारण्यात आलेल्या सावरकरनगरीत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या साहित्यांचे विशेष दालन साकारण्यात आले आहे. तसेच त्यांनी भोगलेल्या काळ्या पाण्याच्या शिक्षेची आठवण करून देणारी सेल्युलर जेलची प्रतिकृती हा मुख्य आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. कलाकार सिद्धेश बागवे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तब्बल १८ फूट उंच व १६ फूट रुंद अशी ही प्रतिकृती केवळ पुस्तकांच्या सहाय्याने उभारली आहे

वाचाल तर वाचाल

यापूर्वीही या उपक्रमात पुस्तकांचे शहर, तसेच अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती अशा कल्पक संकल्पना साकारण्यात आल्या होत्या. अशा अभिनव उपक्रमांमुळे पुस्तकप्रेमींमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यास मोठी मदत होते. रोजच्या धकाधकीच्या जीवनात वाचनाची सवय लावल्यास मानसिक आरोग्य सुधारते, ताणतणाव कमी होतो आणि जीवनाला नवी दिशा मिळते, असे मत आयोजकांनी व्यक्त केले. ‘वाचाल तर वाचाल’ या उक्तीप्रमाणे जीवनात प्रगती साधण्यासाठी उत्तम साहित्य वाचन आवश्यक असल्याने नागरिकांनी या पुस्तक प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहनही आयोजकांनी केले आहे.