
युगांडाचे लष्करप्रमुख आणि राष्ट्राध्यक्ष योवेरी मुसेवेनी यांचे सुपुत्र मुहूझी कैनेरुगाबा यांनी आपल्या वादग्रस्त विधानांनी आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. कैनेरुगाबा यांनी तुर्किये या देशाकडे तब्बल 1 अब्ज डॉलर्स (सुमारे 8400 कोटी रुपये) आणि देशातील सर्वात सुंदर महिला पत्नी म्हणून देण्याची अजब मागणी केली आहे. या मागण्या मान्य न झाल्यास 30 दिवसांच्या आत तुर्कियेसोबतचे राजनैतिक संबंध तोडण्याचा आणि दूतावास बंद करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
कैनेरुगाबा यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एकामागोमाग एक ट्विट करत तुर्कियेवर गंभीर आरोपक केले आहेत. सोमालियातील बंदर आणि विमानतळांसारख्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमधून तुर्किये मोठा नफा कमवत आहे. मात्र, या भागात सुरक्षा पुरवण्याचे आणि दहशतवादाशी लढण्याचे कठीण काम गेल्या दोन दशकांपासून युगांडाचे सैन्य करत आहे, असा दावा कैनेरुगाबा यांनी केला.
युगांडाने आफ्रिकन युनियन मिशनचा भाग म्हणून अल-शबाब या दहशतवादी संघटनेविरुद्ध लढण्यासाठी सोमालियात आपले सैन्य तैनात केले आहे. या भागात तुर्कियेला होणारा नफा युगांडाच्या लष्करी योगदानामुळेच मिळवला आहे. म्हणून युगांडाला 1 अब्ज डॉलर्सचा सुरक्षा लाभांश मिळायला हवा, अशी मागणी कैनेरुगाबा यांनी केला आहे.
तुर्कियेसाठी हा एक साधा व्यवहार आहे. एकतर त्यांनी आम्हाला पैसे द्यावे, अन्यथा मी येथील त्यांचे दूतावास बंद करेन. त्यांनी प्रत्युत्तर म्हणून तुर्कियेमधील आमचा दूतावास बंद केला तरी आम्हाला काही अडचण नाही. हा सोशल मीडियाचा ड्रामा नसून हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे, अशी धमकीही कैनेरुगाबा यांनी दिली. तसेच युगांडाच्या नागरिकांना सुरक्षेच्या कारणास्तव तुर्कियेला प्रवास न करण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.
This guy, Muhoozi Kainerubaga is the chief of the Ugandan 🇺🇬 Army, son of the dictator Museveni an possible future leader of the country
Here, he is threatening Turkiye 🇹🇷, asking for 1 billion $ and the most beautiful turkish woman as a wife or he stops diplomatic relations. pic.twitter.com/xPORjQTVHm
— Clément Molin (@clement_molin) April 11, 2026
दरम्यान, पैशांच्या मागणीसोबतच कैनेरुगाबा यांनी तुर्कियेला त्यांच्या देशातील सर्वात सुंदर महिला आपल्या हवाली करण्यास सांगितले आहे. त्या महिलेशी आपल्याला लग्न करायचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याच्या या अजब मागणीमुळे सोशल मीडियावर तीव्र संताप आणि आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
इटलीच्या पंतप्रधानांनाही घातली होती मागणी
मुहूझी कैनेरुगाबा यांनी अशा प्रकारचे अजब विधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही. ऑक्टोबर 2022 मध्ये त्यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्या बदल्यात त्यांनी मेलोनी यांना जगातील सर्वात सुंदर मानल्या जाणाऱ्या 100 अंकोले गाई देण्याची ऑफर दिली होती.

























































