Ratnagiri News – स्वराज्य सेनापती हंबीरराव किताब दिवस उत्साहात साजरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चिपळूण – तालुक्यातील शिवगड, नलावडेवाडी,दळवटणे येथे छोटेखानी स्वरूपात हंबीरराव किताब दिवस नुकताच उत्साहाने साजरा करण्यात आला. ८ एप्रिल १६७४ रोजी शिवप्रभूंच्या स्वहस्ते मूळनांव हंसाजी मोहिते नामक शूरवीर लढवय्ये योद्धे यांसी’ हंबीरराव ‘ हा किताब सन्मानपूर्वक प्रदान केला गेला होता .

तत्काळी त्यांना महाराजांच्याकडून मानाची मंगलवस्त्रे, शस्त्रास्त्रे, शुभ प्रतिके, मर्दानी अलंकार बहाल करण्यात आले. हा सामरिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण सोहोळा दळवटणे लष्करी छावणी सैन्यतळां समक्ष घडला. सुमारे ३५२ वर्षांपूर्वी घडलेल्या तेजस्वी घटनेची चिपळूण तालुका समाविष्ट दळवटणेची ही भूमी प्रत्यक्ष साक्षीदार आहे.

त्या ऐतिहासिक घटनेचे औचित्य साधून हंबीरराव किताब प्रदान दिवस उत्स्फूर्तपणे सहभागी शिव इतिहास प्रेमींतर्फे साजरा करण्यात आला. यावेळी थोर इतिहासतज्ज्ञ माननीय पांडुरंग बलकवडे व हंबीरराव मोहिते घराण्यातील सदस्य आणि इतिहास अभ्यासक माननीय विक्रमसिंह मोहिते हे प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून लाभले. त्यांनी प्रथम ग्रामदेवता श्री कान्होबा – काळेश्री-झोलाई देवस्थानचे मनोभावे दर्शन घेतले. त्यानंतर रेव्याचे तळे या ऐतिहासिक स्फूर्ती स्थळाची पाहणी करून प्रखर स्मृतींना उजाळा देऊन विनम्र अभिवादन केले गेले. तद्नंतर गावातील शिवप्रतिष्ठान संस्थेस मान्यवरांच्या हस्ते हंबीरराव मोहिते यांची प्रतिमा सस्नेह भेट दिली गेली. त्याचे यथोचित पूजन करण्यात आले. मान्यवरांसमवेत उपस्थित इतिहासप्रेमींनी खुल्या चर्चेमध्ये सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, आभार प्रदर्शन समन्वयक समीर कोवळे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्येष्ठ इतिहासप्रेमी, साहित्यिक प्रकाशराव देशपांडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रकाशबापू काणे, उद्योजक योगेश गोखले, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. अभय मोहिते यांचे परिश्रम लाभले. या कार्यक्रमापश्चात चिपळूणचे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी आकाश लिगाडे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली कार्यालयीन दालनामध्ये चिपळूणच्या इतिहास व आगामी विकासात्मक दिशा याबाबत वैचारिक मंथनात्मक चर्चा संपन्न झाली. उपरोक्त मान्यवरांसह इतिहासप्रेमी सहभागी झाले होते. या चर्चेमध्ये दळवटणे व चिपळूण परिसर येथील पौराणिक, ऐतिहासिक विविध संदर्भ त्याचप्रमाणे हंबीरराव मोहिते यांचे चरित्रात्मक माहिती दालन व स्मारक उभारणी याबाबत आकाश लिगाडे यांचे समवेत उपस्थित मान्यवर इतिहास संशोधक यांची सकारात्मक चर्चा घडली.या संपूर्ण यशस्वी कार्यक्रमाच्या समन्वयकाची भूमिका इतिहास, पर्यटन अभ्यासक समीर कोवळे यांनी समर्थपणे पार पाडली.