छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलरचा स्फोट, १० ठार तर २३ जण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
vedanta-power-plant-boiler-explosion-in-chhattisgarh-10-killed-23-injured (1)

छत्तीसगडमधील शक्ती जिल्ह्यात मंगळवारी एका पॉवर प्लांटमध्ये झालेल्या स्फोटात १० जणांचा मृत्यू झाला असून २३ हून अधिक जण जखमी झाले आहेत. काही कामगार अजूनही घटनास्थळी अडकल्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सिंहितराई गावातील वेदांता लिमिटेड पॉवर प्लांटमधील बॉयलर ट्यूबमध्ये हा स्फोट झाला, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून, ढिगाऱ्याखाली काही कामगार अडकले असण्याची भिती असल्याने बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

पॉवर प्लांटच्या प्रवक्त्याने सांगितले की, १४ एप्रिल रोजी दुपारी सिंहितराई येथील प्लांटमधील एका बॉयलर युनिटमध्ये ही दुर्दैवी घटना घडली. या युनिटचे देखभाल करणाऱ्या आमच्या ‘एनजीएसएल’ (NGSL) या उप-कंत्राटदार कंपनीचे कर्मचारी यामध्ये अडकले आहेत. जखमी झालेल्या सर्वांना वैद्यकीय मदत आणि उपचार देणे ही आमची प्राथमिकता आहे. आम्ही जखमींना पूर्ण सहकार्य करत असून वैद्यकीय पथके आणि स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधत आहोत. या घटनेची सविस्तर माहिती घेण्याचे काम सुरू असून संबंधित अधिकारी आणि कंपनीच्या सहकार्याने सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घटना ‘दुःखद’ असल्याचे सांगत मृतांच्या वारसांना २ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.