
मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात पंजाब किंग्जचा अष्टपैलू खेळाडू शशांक सिंह क्षेत्ररक्षण करताना गंभीररीत्या जखमी झाला आहे. पॉवरप्लेच्या शेवटच्या चेंडूवर धाव रोखण्याचा प्रयत्न करत असताना हा अपघात घडला. मिड-ऑनवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या श्रेयसने नॉन-स्ट्रायकर एंडला धावबाद करण्यासाठी वेगाने थ्रो फेकला, मात्र त्याचे लक्ष्य चुकले. जमिनीवर टप्पा पडल्यानंतर चेंडूने अचानक उसळी घेतली आणि तो थेट शशांकच्या डोक्यावर आदळला. या अनपेक्षित आघातामुळे शशांक मैदानातच कोसळला, त्यानंतर तातडीने फिजिओनी धाव घेत त्याला बर्फाचा शेक दिला. मात्र, दुखापत गंभीर असल्याने शशांकला फिजिओसोबत मैदान सोडून बाहेर जावे लागले.
दुसरीकडे, मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना दमदार सुरुवात केली असून 11 षटकांचा खेळ संपला तेव्हा 2 बाद 110 धावा फलकावर लावल्या आहेत. शशांकच्या दुखापतीचा फायदा घेत मुंबईच्या फलंदाजांनी पंजाबच्या गोलंदाजांवर दबाव कायम ठेवला आहे. यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक सध्या 62 धावांवर खेळत असून त्याने आक्रमक अर्धशतक झळकावले आहे, तर त्याला नमन धीर (39*) उत्तम साथ देत आहे. या जोडीने मैदानावर जम बसवला असून मुंबई मोठ्या धावसंख्येच्या दिशेने कूच करत आहे.


























































