
पश्चिम बंगालमध्ये एकीकडे निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आरोपप्रत्यारोपांच्या फैरी छडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधीपक्षांनी सभांचा धडका लावला आहे. अशातच, आयकर विभागाने शुक्रवारी तृणमूल काँग्रेसचे (TMC) आमदार देबाशिष कुमार यांच्याशी संबंधित दोन ठिकाणांवर छापे टाकले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ६ च्या सुमारास देबाशिष कुमार यांचे मनोहरपुकर रोडवरील निवासस्थान आणि त्यांचे निवडणूक कार्यालय अशा दोन्ही ठिकाणी एकाच वेळी झडती घेण्यास सुरुवात झाली.
देबाशिष कुमार हे रासबिहारी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार असून, याच जागेवरून ते पुन्हा एकदा निवडणूक लढवत आहेत. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ च्या दुसऱ्या टप्प्यात २९ एप्रिल रोजी रासबिहारीमध्ये मतदान होणार असून, ४ मे रोजी मतमोजणी पार पडेल. भाजपने त्यांच्या विरोधात स्वप्न दासगुप्ता यांना मैदानात उतरवले आहे. स्वप्न दासगुप्ता हे स्तंभलेखक आहेत.
आयकर विभागाने केलेली ही कारवाई पश्चिम बंगालमधील कथित बेकायदेशीर जमीन हडपल्याच्या प्रकरणाशी संबंधित असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे ETच्या वृत्तात म्हटले आहे. मात्र याव्यतिरिक्त आयकर विभागाच्या या कारवाईचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
यापूर्वी, कथित बेकायदेशीर जमीन बळकावणे आणि गुंतवणूक फसवणूक प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ED) देबाशिष कुमार यांना अनेकवेळा समन्स बजावले होते. त्यांना १, ३ आणि ९ एप्रिल रोजी सॉल्ट लेक येथील ‘सीजीओ कॉम्प्लेक्स’मध्ये चौकशीसाठी बोलावण्यात आले होते आणि प्रत्येक वेळी ते तपास यंत्रणेसमोर हजर झाले होते.
यासोबतच प्रसिद्ध व्यापारी अमित गंगोपाध्याय, ज्यांच्या ठिकाणांवरही ED ने छापे टाकले होते, त्यांच्याशी देबाशिष कुमार यांचे काही आर्थिक व्यवहार झाले होते का, याचा तपास ED करत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, या छाप्यांनंतर देबाशिष कुमार यांच्या निवासस्थानाबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तिथे जोरदार घोषणाबाजी केली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी घटनास्थळी केंद्रीय दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.


























































