
प्रेयसीवर वाईट नजर ठेवतो या संशयातून टेम्पोचालकाच्या छातीत व डोळ्यात स्क्रूड्रायव्हर खुपसून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना काशिमीरा येथील डचकूलपाडा येथे घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
काशिमीरा परिसरातील काशीगावातील डचकूल पाडा परिसरात प्रकाश वाळुंज हा टेम्पोचालक राहतो. काशीगावातील नीलकमल नाक्यावर त्याचा टेम्पोचा व्यवसाय होता. वाळुंज याची आरोपी सागर साळुंखेशी चांगली ओळख होती. वाळुंज याने एक महिन्यापूर्वी त्याच्या बायको व मुलांना पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर तालुक्यातील वाळुंज या गावी पाठवून दिले होते. वाळुंज व साळुंखे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून भांडणे होत होती. वाळुंज हा सागरच्या प्रेयसीकडे वाईट नजरेने पाहतो अशी सागरची तक्रार होती.
शुक्रवारी मध्यरात्री याच कारणावरून दोघांचे जोरदार वाद झाले आणि त्यातूनच सागर साळुंखे याने प्रकाश वाळुंज याच्या छातीत व डोळ्यात स्क्रूड्रायव्हर खुपसून त्याची हत्या केली. यानंतर तो फरार झाला. काशीगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल पाटील यांनी तपासाची चक्रे फिरवून आरोपी सागर याला अटक केली.
























































