
IPL 2026 मध्ये लखनऊ सुपर जायंट्स संघ अजूनही पहिल्या गिअरवर अडकला आहे. हंगामातील 29 व्या सामन्यात लखनऊ सुपर जाएंट्सला पंजाब किंग्सकडून 54 धावांनी मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे लखनऊचे चाहते निराश झाले आहेत. संघात दर्जेदार खेळाडूंचा भरणा आहे, मात्र या खेळाडूंना अजूनही लौकिकाला साजेसा खेळ करता आलेला नाही. या बाबतीत सध्या निकोलस पुरनचं नाव आघाडीवर आहे. यंदाच्या मोसमात लखनऊला 6 सामन्यांपैकी 4 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. लखनऊच्या या सुमार कामगिरीमुळे त्यांचा पुढचा प्रवास अत्यंत खडतर झाल्याचे चित्र आहे.
लखनऊने निकोलस पूरनला तब्बल 21 कोटी रुपये देऊन रिटेन केले होते, मात्र तो या विश्वासाला पात्र ठरताना दिसत नाहीये. गेल्या मोसमात 500 पेक्षा जास्त धावा चोपून काढणाऱ्या पूरनची बॅट यंदा पूर्णपणे शांत आहे. या हंगामातील 6 डावांमध्ये त्याने केवळ 51 धावा केल्या असून त्याची सरासरी 8.5 आणि स्ट्राईक रेट 80 च्या आसपास आहे. पूरनच्या या सुमार कामगिरीमुळे आता त्याला प्लेइंग 11 मधून बाहेर काढण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणारा लखनऊचा संघ 6 सामन्यांत केवळ 2 विजयांसह 4 गुण मिळवून गुणतालिकेत 8 व्या स्थानावर फेकला गेला आहे. प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी त्यांना आगामी सामन्यांत विजय मिळवणे अनिवार्य आहे. लखनऊचा पुढचा सामना 22 एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणार आहे. सलग दोन सामने गमावल्यानंतर आता राजस्थानविरुद्धच्या या महत्त्वाच्या लढतीत लखनऊचा संघ कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
























































