
>> संतोष घारे
’क्रिप्टो करन्सी’चा बाजार हा पूर्णपणे मागणी आणि पुरवठय़ावर आधारित असतो, त्याला कोणत्याही भौतिक मालमत्तेचे पाठबळ नसते. त्यामुळे यामध्ये गुंतवणूक करताना हव्यास हा सर्वात मोठा शत्रू ठरू शकतो. तज्ञांच्या मते, तरुणांनी आपली संपूर्ण पुंजी अशा अस्थिर क्षेत्रात गुंतवू नये. ज्या रकमेचे नुकसान सोसण्याची क्षमता आहे, तितकीच रक्कम प्रायोगिक तत्त्वावर गुंतवणे शहाणपणाचे ठरेल.
सध्याच्या तंत्रज्ञानस्नेही काळात आर्थिक गुंतवणुकीचे संदर्भ वेगाने बदलत आहेत. पारंपरिक गुंतवणूक पर्यायांना मागे सारत आता ’क्रिप्टो करन्सी’ अर्थात आभासी चलनाचे आकर्षण तरुण पिढीमध्ये मोठय़ा प्रमाणावर वाढल्याचे दिसून येत आहे. अलीकडील आकडेवारीनुसार, भारतातील प्रत्येक चार तरुणांपैकी एक जण या जोखमीच्या बाजारात आपले नशीब आजमावत आहे. पीआय-42 आणि हॅश्ड इमर्जेंट यांच्या ताज्या अहवालातील यासंदर्भातील निष्कर्ष धक्कादायक आहेत. विशेष म्हणजे, या गुंतवणुकीत 25 वर्षांखालील तरुणांचा वाटा 60 टक्क्यांहून अधिक असून तो या क्षेत्रातील वाढत्या व्याप्तीचे द्योतक आहे.
एकेकाळी केवळ महानगरांपुरता मर्यादित असलेला हा व्यवहार आता देशाच्या कानाकोपऱयात पोहोचला आहे. उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश यांसारख्या राज्यांसह अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय यांसारख्या दुर्गम भागातील तरुणही यात हिरीरीने सहभागी होत आहेत. गुंतवणुकीचे हे प्रमाण केवळ हौस म्हणून नाही, तर अभ्यासपूर्ण पद्धतीने वाढताना दिसत आहे. पूर्वी गुंतवणुकीपूर्वी संशोधन करणाऱयांचे प्रमाण 45 टक्के होते, ते आता वाढले आहे. तरुण पिढी टेलिग्राम, एस (ट्विटर) आणि यूटय़ुब यांसारख्या समाजमाध्यमांचा वापर करून तांत्रिक विश्लेषण करण्याचा प्रयत्न करत आहे. ही परिपक्वता आश्वासक वाटत असली, तरी या बाजारातील ‘अनिश्चितता’ हा सर्वात मोठा अडथळा ठरत आहे.
या बाजारपेठेत केवळ खरेदी-पीच नाही, तर ‘डेरिव्हेटिव्हज’ किंवा वायदा बाजारातील सहभागही दुपटीने वाढला आहे. यात प्रत्यक्ष चलन न खरेदी करता केवळ त्यांच्या भविष्यातील किमतीवर सट्टा लावला जातो.‘लिव्हरेज’चा वापर करून कमी भांडवलात जास्त नफा मिळवण्याचा मोह तरुणांना याकडे खेचत आहे. मात्र, हाच मोह अनेकदा मोठय़ा आर्थिक नुकसानीला निमंत्रण देणारा ठरतो.
भारतात क्रिप्टो चलनाबाबत अद्यापही स्पष्ट कायदेशीर चौकट किंवा नियामक यंत्रणा अस्तित्वात नाही. केंद्र सरकारने याला ‘व्हर्च्युअल डिजिटल अॅसेट’ असे संबोधले असून, त्यातून मिळणाऱया नफ्यावर कर आकारणी केली जाते. मात्र, याचा अर्थ असा नाही की हे अधिकृत चलन आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने वेळोवेळी यातील जोखमीबाबत इशारा दिला आहे. कायदेशीर संरक्षण नसल्यामुळे, कोणत्याही प्रकारची फसवणूक झाल्यास दाद मागण्यासाठी निश्चित व्यासपीठ उपलब्ध नाही. ही स्थिती गुंतवणूकदारांसाठी दुधारी तलवार ठरत आहे.
केवळ आर्थिक नुकसान हाच क्रिप्टोमधील गुंतवणुकीचा धोका नाही, तर त्याचे सामाजिक परिणामही गंभीर आहेत. कमी वेळात आणि कमी कष्टांत श्रीमंत होण्याची ओढ तरुणांमध्ये निर्माण होत आहे. यामुळे श्रमाचे महत्त्व कमी होऊन नशिबावर विसंबून राहण्याची प्रवृत्ती बळावत असल्याचे निरीक्षण तज्ञांनी नोंदवले आहे. 24 तास सुरू राहणाऱया या बाजारपेठेमुळे तरुणांच्या मानसिक आरोग्यावर ताण येत आहे. किमतीतील चढ-उतारामुळे निर्माण होणारी चिंता, तणाव आणि काही प्रसंगी सायबर फसवणुकीचे बळी ठरल्यामुळे येणारे नैराश्य, ही आजच्या काळातील नवी आव्हाने आहेत.
विशेषत छोटय़ा शहरांतील तरुण, ज्यांना यातील तांत्रिक बारकाव्यांची पूर्ण जाण नाही, ते गुन्हेगारांच्या जाळ्यात सहज अडकतात. ‘दुप्पट परतावा’ देण्याच्या आमिषाने कोटय़वधी रुपयांची फसवणूक झाल्याच्या घटना महाराष्ट्रासह अनेक शहरांतून समोर आल्या आहेत. या अत्यंत गुंतागुंतीच्या आणि जोखमीच्या क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढत असल्याचे दिसून येते. भारतातील प्रत्येक आठ गुंतवणूकदारांमागे एक महिला आहे. आर्थिक निर्णयांमध्ये महिलांचा वाढता हस्तक्षेप आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्याची त्यांची तयारी ही एक सकारात्मक बाब मानली पाहिजे. जोखीम व्यवस्थापन आणि संयम या बाबतीत महिला गुंतवणूकदार अधिक सजग असल्याचे अनेकदा दिसून आले आहे.
’क्रिप्टो करन्सी’चा बाजार हा पूर्णपणे मागणी आणि पुरवठय़ावर आधारित असतो. त्याला कोणत्याही भौतिक मालमत्तेचे पाठबळ नसते. त्यामुळे, यामध्ये गुंतवणूक करताना हव्यास हा सर्वात मोठा शत्रू ठरू शकतो. तज्ञांच्या मते, तरुणांनी आपली संपूर्ण पुंजी अशा अस्थिर क्षेत्रात गुंतवू नये. ज्या रकमेचे नुकसान सोसण्याची क्षमता आहे, तितकीच रक्कम प्रायोगिक तत्त्वावर गुंतवणे शहाणपणाचे ठरेल. तांत्रिक बाबींचे सखोल ज्ञान घेतल्याशिवाय आणि बाजारातील फसवणुकीच्या प्रकारांची माहिती करून घेतल्याशिवाय यात पाऊल टाकणे म्हणजे स्वतच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखे आहे. डिजिटल युगात संधी भरपूर आहेत, परंतु त्या संधींचे सोने करायचे की कोळसा, हे पूर्णपणे गुंतवणूकदाराच्या विवेकबुद्धीवर अवलंबून आहे. शेवटी, संपत्ती निर्मितीसाठी शॉर्टकट शोधण्यापेक्षा संयम आणि सातत्य हीच यशाची गुरुकिल्ली ठरते, हे विसरून चालणार नाही
























































