भाषा सरस्वती – कोकणी साहित्यातील लखलखते नाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> धीरज कुलकर्णी
[email protected]

स्त्रीजीवन आणि लोककला, लोककथा यांच्या अभ्यासक डॉ. जयंती नायक कोकणी साहित्यातील मानाचे नाव. कोकणी भाष, गोव्याचे लोकजीवन व इतिहास या संशोधनाचा विस्तारलेला पैस त्यांच्या लेखनातून जाणवतो. गोव्याच्या भूमीतील या साहित्य अकादमी विजेत्या लेखिकेविषयी…

अहो, कपाळावरील कुंकवाचा ठिपकासुद्धा मोठा वाटावा इतका आमचा गोवा छोटा.” डॉ. जयंती नायक उत्साहाने गोव्याबद्दल, कोकणी भाषेबद्दल बोलतात. त्यांचे बोलणे ऐकत असताना जाणवते ते म्हणजे त्यांचा कोकणी भाषेचा, गोव्यातील इतिहास, लोकजीवन यांचा प्रगाढ अभ्यास आणि हे सगळं सहजगत्या, कोणताही अभिनिवेश न बाळगता.
डॉ. जयंती नायक या कोकणी साहित्यातील एक लखलखते नाव. साहित्य अकादमी विजेत्या या लेखिका ओळखल्या जातात ते त्यांनी स्त्रीजीवन आणि लोककला, लोककथा यांचा केलेल्या अभ्यास व वैशिष्टय़पूर्ण मांडणीसाठी. 1962 साली जन्मलेल्या डॉ. नायक यांनी मुंबई विद्यापीठात बी. ए. तर मैसूर विद्यापीठातून एम. ए. व पीएच. डी. पूर्ण केले आहे. त्यांचा पीएच. डीचा विषय, ‘कोकणी लोकसाहित्यातील स्त्रीप्रतिमा:सामाजिक व सांस्कृतिक अभ्यास’ असा होता. हा प्रबंध त्यांनी कोकणी भाषेतूनच सादर केला.

गोवा ही ऐतिहासिक भूमी. कदंबवंशीय राजांपासून गोव्याच्या इतिहासाची पाने वाचायला मिळतात. काळानुसार असंख्य स्थित्यंतरे या भूमीने पाहिली. शेती, अन्न, वस्त्र, घरबांधणी या प्रत्येक क्षेत्रात बदल होत गेले. पोर्तुगीजांपूर्वीही या भूमीवर आाढमणे झाली. त्या सर्वातून गोव्याची स्वतंत्र ओळख, संस्कृती घट्ट होत गेली. इथे जो आाढमणाला आला तोही इथलाच झाला. या मातीतच त्याला स्वतचा शोध लागला. अशा या गोव्याच्या लोकजीवनाचा, इतिहासाचा अभ्यास करायचा म्हणजे काळाचा केवळ प्रचंड पट उलगडून दाखवायचा इतकेच नव्हे तर त्याकाळच्या बदलाचा सांस्कृतिक आणि सामाजिक अनुबंध तपासणे आणि आजच्या काळाशी त्याची नाळ कुठे जुळते हे तपासणे खरे संशोधकांचे कार्य. डॉ. जयंती नायक यांनी अशा सच्च्या संशोधकाच्या भूमिकेतून काम केल्याने आज त्यांच्या कामाला एक वजन प्राप्त झाले आहे.

डॉ. नायक यांच्या साहित्यसंपदेची व मानसन्मानाची दीर्घ यादी पाहिली की, अचंबित व्हायला होतं. लघुकथा, दीर्घकथा, कविता, कादंबरी या लेखनासोबतच शोधनिबंध, संशोधनात्मक पुस्तके असा त्यांचा लेखनाचा मोठा पैस आहे. शासनाच्या विविध भाषा व साहित्यविषयक समित्यांवर त्यांनी काम केले आहे व आजही करत आहेत. इतके मोठे कार्य करूनही आजही त्यांचे पाय जमिनीवर आहेत. बोलताना आपला मुद्दा ठामपणे मांडत असतानाही त्या नम्रपणे बोलतात. डॉ. जयंती नायक यांच्या साहित्यातील स्त्रिया या इतिहासापासून आजच्या काळापर्यंत वावरतात. आजच्या काळातील आव्हानांना त्या धैर्याने सामोऱया जातात. स्त्राrजीवनाचे चित्रण म्हणजे केवळ त्यांच्या दुःखाचे, बंधन, हालअपेष्टा यांचे चित्रण नसून, कालानुरूप स्त्रियांनी पेललेली आव्हाने, त्यांचे भावजीवन, कुटुंबाला सांभाळतानाही स्वतला उभे करण्याची जिद्द हे दिसून येते. डॉ. जयंती नायक यांची लेखनाची भाषा ही संशोधकाची जड भाषा नसून अगदी साधीसोपी संवाद साधणारी बोलीच असल्याने त्यांना अधिक लोकप्रियता प्राप्त झाली.

गोव्यामध्ये कोकणी भाषा आणि मराठी भाषा हा वाद जुनाच आहे. डॉ. जयंती नायक या ठामपणे कोकणी भाषेच्या समर्थक आहेत. मात्र मराठी भाषेतूनही त्यांनी भरपूर लेखन केले आहे. ‘गर्जन’,‘अथांग’ हे लघुकथासंग्रह, ‘कुकमादेवीची दीपमाळ’, ‘काळमाया’ ही नाटके, ‘मिर्गवेणा’ कवितासंग्रह, ‘वागमामाची फजिती’, ‘नवरंगी फूल’ हे बालसाहित्य, यासोबतच लोककथा वाङ्मयात ‘पेडणेचो दसरो’, ‘आमोणे: एक लोकजीण’ अशी अनेक पुस्तके समाविष्ट आहेत. कोकणी लोककथांचा कोश हे त्यांनी केलेल्या कामातील उल्लेखनीय काम सांगता येईल. ज्याप्रमाणे डॉ. नायक यांच्या साहित्याचे अनेक भाषांत अनुवाद झालेत त्याप्रमाणे त्यांनीही इतर भाषांतील पुस्तकांचे कोकणीत अनुवाद केले आहेत.
भाषेचा अभिमान ही वेगळी गोष्ट असून त्यात अभिनिवेश न ठेवता सर्व भाषांमध्ये लेखक हा एकप्रकारे सांस्कृतिक जडणघडणीचा दुवा साधत असतो हे डॉ. नायक यांच्या साहित्यातून आणि कार्यातून स्पष्ट होते. केवळ भाषाभिमान म्हणून इतर भाषांना विरोध करण्यापेक्षा अशा प्रकारचे स्वभाषापोषणाचे कार्य इतरही भाषेतील लेखकांनी केल्यास ते चित्र साहित्यासाठी आशादायक असेल.