
>> रविप्रकाश कुलकर्णी
वृत्तपत्र क्षेत्रात वेगवेगळ्या प्रकारची माणसं प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष नेहमी भेटत असतात. त्याचे ठसे मनावर उमटत असतात. पंढरीनाथ तामोरे यांना ‘दर्याचा राजा’ हे त्रैमासिक संपादित करताना या प्रकारचा अनुभव चांगला आलेला आहे. त्यात लिहिलेली निवडक व्यक्तीचित्रं ‘आदर्शाचे प्रकाशदीप’ या संग्रहात आलेली असून हा संग्रह शारदा प्रकाशनने प्रकाशित केलेला आहे. याबाबत मनोगतात लेखक म्हणतो, ‘या संग्रहातील व्यक्तिरेखांमध्ये मला प्रत्यक्ष भेटलेल्या, त्यांचा सहवास लाभलेल्या, वाचनात असो की दूरवरून दिसलेल्या अशा 28 व्यक्तिरेखा माझ्या मायेच्या माणसांचे, त्यांच्या अनुभवांच्या, कार्यकर्तृत्वाच्या विशाल प्रतिभेच्या अनुभवाचे व्यक्तिचित्रण घडवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. हे आदर्शांचे प्रकाशदीप आपलेही जीवन उजळून टाकतील असा विश्वास आहे.’
या संग्रहात एपीजे अब्दुल कलाम, रामनाथ कोविंद यांसारख्या दुरुस्थ व्यक्तीपासून ग्रेस, आनंदयात्री मंगेश पाडगावकर अशा साहित्यिक व्यक्तींबद्दल लेखक तामोरे यांनी लिहिलेले आहेच. शिवाय मानकर काका, सुसंस्कृत नेता सुधीर भाऊ जोशी, आगुस्तन कोळी अशा विविध क्षेत्रांतील लोकांवर लेखन केलेले दिसते. त्यातील वेचक व वेधक हकिकती पहा – एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रपती असताना इफ्तार पार्टीस लागणारा अडीच ते तीन लाख खर्च रद्द करून त्यांनी ते पैसे अनाथालयाला दिले. एवढेच नव्हे तर त्यांनी स्वतच्या एक लाख रुपयाची त्यात भर घातली! ते राष्ट्रपती असताना त्यांचा बावन्न माणसांचा परिवार त्यांना भेटायला दिल्लीत आला. ते आठ दिवस राष्ट्रपती भवनात राहिले. असं होतच असतं. मात्र हे पाहुणे परत गावी गेल्यानंतर कलाम यांनी हा खर्च व्यक्तिगत बँक अकाऊंटमधून पैसे काढून राष्ट्रपती भवनाच्या खात्यात जमा केला. ते राष्ट्रपती भवनात एकटेच राहत. तेव्हा त्यांची संपत्ती काय होती तर पुस्तकांनी भरलेली कपाटं!
राष्ट्रपती आणि राष्ट्रपती भवनाचा इतिहास जेव्हा केव्हा लिहिला जाईल तेव्हा असं हे उदाहरण एकमेव असेल. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे कोळी समाजाचा अभिमान आहेत असं सांगून लेखक तामोरे नमूद करतात की, ते ‘दर्याचा राजा’चे अंक त्यांना पाठवत असतात.
गाण्यात माझ्या माझे इमान आहे, ज्याचे खरे न गाणे तो बेइमान आहे. अशा कवितांशी, त्यातील शब्दांशी आणि गाण्यांशी खऱया अर्थाने नाते जुळलेला कवी म्हणजे मंगेश पाडगावकर. असं पाडगावकरांचं नेमकं वर्णन करून लेखक पंढरीनाथ तामोरे म्हणतात की, मंगेश पाडगावकर यांना भेटणे हा एक निखळ आनंद होता. आमच्या ‘दर्याचा राजा’च्या दिवाळी 2011 अंकाचे प्रकाशन करण्यासाठी मी त्यांना फोनवरून विनंती करताच त्यांनी लगेच मान्यही केले, पण तेव्हा ते म्हणाले, “मला काय हवे आहे ते माहीत आहे ना?” मी “हो” म्हटले. पुढे तामोरे लिहितात, आम्ही सगळे त्यांच्या निवासस्थानी गेलो आणि त्यांना आवडणारे पापलेट, बांगडे अशा चविष्ट ताज्या माशांबरोबर त्यांच्या आवडीचे पेयही त्यांना देताच ते खूश झाले.
माणिक गोडघाटे उर्फ कवी ग्रेस यांच्या वरील लेखाचे शीर्षक आहे ग्रेसफुल कविश्रेष्ठ. कवीने ग्रेस हे नाव का घेतले याचा वेगळा इतिहास आहे. मात्र तामोरे म्हणतात, ग्रेस म्हणजे परमेश्वरी कृपा कशी आहे याचा प्रत्यय त्यांच्या साहित्यात येतो. तामोरे यांच हे निदान नक्कीच विचार करण्यासारखं आहे. मनस्वी आणि कलंदर मानकर काकांचं वर्णन करून ते हकिकत नोंदवतात की, त्यांचं लग्न 4 ऑक्टोबर 1965 ला झालं तेव्हापासून ते प्रत्येक महिन्याच्या 4 तारखेला एक पुस्तक विकत घ्यायचे आणि दोघे एक चित्रपट पाहून लग्नाचा वाढदिवस साजरा करायचे. हा नेम त्यांनी शेवटपर्यंत पाळला. मानकर काकांच्या आत्मचरित्राचे नाव ‘देवचार’ आहे. त्याबाबत लेखक म्हणतो ते एक देवचारच होते. कारण भुताचे झपाटलेपण व देवाचे निर्मळपण त्यांच्या स्वभावात होते.
आगुस्तीन कोळी यांचे शब्दचित्र रंगवताना तामोरे यांनी मच्छीमारांसाठी बोटीवर वाचनालय सुरू केले होते. ही हकिकत कळण्यासाठी हे पुस्तक वाचायलाच हवे. अशा दुर्मिळ आठवणी हे या व्यक्तिचित्रांचं वैभव आहे.
























































