
महाराष्ट्र राज्य परिवहन विभागामार्फत येत्या १ मेपासून ऑटो रिक्षा आणि टॅक्सीचालक-मालक यांना मराठी भाषा बोलता, लिहिता, वाचता येणे सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळे अमराठी चालकांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विरार शाखेच्या वतीने मराठी शिकवण्यासाठी वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. अमराठी चालकांना मराठी शिकण्यासाठी सहकार्य करू, मात्र या शासन निर्णयास विरोध करून प्रवाशांना वेठीस धरले तर खबरदार, असा इशाराही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
रिक्षा चालकांकरिता शिवसेना विरार शाखेत मराठीचे शिकवणी वर्ग सुरू करण्यात आले आहेत, असे शिवसेना विरार शहरप्रमुख उदय जाधव यांनी सांगितले. शासनाने यापुढे जास्तीत जास्त मराठी भाषिकांनाच रिक्षा आणि टॅक्सीचे परवाने द्यावेत, अशी मागणीही जाधव यांनी केली.
याप्रसंगी शिव वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष आनंद चोरघे, उपतालुकाप्रमुख नरेश वैद्य, शीला लष्करे, उपशहरप्रमुख जितेंद्र खाडे, महेंद्र सकपाळ, रोशनी जाधव, जयश्री चव्हाण, पांडुरंग जाधव, गोपीनाथ सावंत, संजय खाडे, प्राजक्ता जांभळे, साक्षी जाधव, रूपाली माने, प्रीतम रावराणे, जिवराज कोकिटकर, दिनेश आदवडे, रवी वाळुंज उपस्थित होते.
कारवाई करण्याची मागणी
शिवसेना विरार शहरप्रमुख उदय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आरटीओ अधिकाऱ्यांसह पोलिसांनाही निवेदन देऊन आंदोलन करणाऱ्या परप्रांतीय रिक्षाचालकांवर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक एल. एम. तुरे आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश शेट्ये आदी उपस्थित होते.

























































