ऐन सुट्टीच्या मोसमात चेंबूरचा जलतरण तलाव बंद, कोचिंगच्या नावाखाली फी घेणे बंद करा; सभासदांची पत्राद्वारे मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऐन उन्हाळी सुट्टय़ांमध्ये चेंबूर येथील जनरल अरुणकुमार वैद्य जलतरण तलाव अचानक बंद करण्यात आला आहे. जलतरण तलाव लीक झाल्याचे कारण देत हा तलाव बंद करण्यात आला आहे. महापालिकेतील काही अधिकाऱयांच्या आडमुठेपणामुळे विद्यार्थ्यांसह येथील शेकडो सभासदांची मोठी गैरसोय होत आहे. या जलतरण तलावात मागील काही दिवसांपासून कोचिंगच्या नावाखाली अतिरिक्त फी वसूल केली जात आहे, सभासदांच्या सुरक्षेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याने या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून भ्रष्ट अधिकाऱयांविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी सभासदांनी मुंबई महापालिका आयुक्तांना पाठवलेल्या पत्रातून केली आहे.

जलतरण तलावात होत असलेल्या समस्यांकडे दुर्लक्ष करणाऱया अधिकाऱयांवर कारवाई करावी, यासाठी काही सभासद पुढे आले असून त्यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त, भायखळा उपउपायुक्त, अरुणकुमार वैद्य तलावाचे व्यवस्थापक आणि मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून आपल्या समस्या मांडल्या आहेत. चेंबूरचा जलतरण तलाव घाटकोपरमधील जलतरण तलावाप्रमाणे कायमचा बंद करण्याचा डाव अधिकाऱयांनी आखल्याची भीती वाटत आहे, असे सभासदांनी म्हटले आहे.

तलाव कायमचा बंद करू नका

हा तलाव कधीपर्यंत सुरू होईल हेही अधिकारी सांगत नाहीत. तलावाचे काम पूर्ण होईपर्यंत सभासदांनी अन्य ठिकाणांच्या जलतरण तलावांकडे शिफ्ट व्हावे, असेही अधिकाऱयांकडून सांगितले जात आहे, परंतु दुसऱया तलावांकडे जाणे हे आम्हाला परवडणारे नसून आम्हाला चेंबूरचाच जलतरण तलाव हवाय, असे सभासद असलेल्या महेंद्र पवार आणि विनायक मुंडे यांनी ‘सामना’शी बोलताना सांगितले.

लाइफ गार्डला प्रथोमचाराचे प्रशिक्षण द्यावे, विद्यार्थ्यांना आणि ज्येष्ठ नागरिक सभासदांना दोन खासगी लाइनमुळे होणारा त्रास थांबवावा, कोचिंगच्या नावाखाली घेत असलेली अतिरिक्त फी तत्काळ बंद करावी, महापालिकेच्या जलतरण तलावामध्ये दोन खासगी लाइनला कोणत्या अधिकाऱयांनी परवानगी दिली याची चौकशी करून त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी या सभासदांनी पत्राद्वारे केली आहे.