
लहान मुलांची प्रतिकारशक्ती कमी असते आणि त्यामुळे त्यांना उष्माघाताचा धोका जास्त असतो. तुमचे मूल या कडक उन्हात शाळेत जात असेल तर, तुम्ही कोणत्या गोष्टींचा विचार करावा आणि कोणत्या चुका टाळाव्यात हे जाणून घेणे गरजेचे आहे. ज्या भागांमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असते आणि उष्ण वारे वाहत असतात तिथे उष्माघाताचा धोका असतो. या उष्णतेच्या लाटेत घराबाहेर पडणे टाळावे. प्रौढांना कामावर किंवा कार्यालयात जावे लागते तर, मुलांना त्यांच्या वेळापत्रकानुसार शाळेत जावे लागते. यामुळे उलटी, थकवा , डीहायड्रेशन, चक्कर येणे अशा समस्या होतात. उलट्या झाल्यामुळे संपूर्ण शरीर थकल्यासारखे वाटू शकते. अशक्तपणामुळे थकवा आणि भूक न लागण्याची समस्या उद्भवू शकते.
- उन्हाळ्यात मुलांना रिकाम्या पोटी आणि पाणी न पिता शाळेत पाठवू नका.
- मुलाजवळ नेहमी पाण्याची बाटली द्या. लक्षात ठेवा की त्यातील पाणी फार थंड नसावे.
- शाळेत जाताना त्यांच्या पाण्याच्या बाटलीत लिंबू पाणी, ओआरएस किंवा सब्जा घालून पाणी द्या. ज्यामुळे त्यांचे शरीर हायड्रेट राहिल. मुलांना थोड्या वेळने पाणी पिण्यास सांगा.
- लहान मुलांना गडद रंगाच्या कपड्यांमुळे अधिक उष्णता लागण्याची शक्यता असते. त्यामुळे मुलांना हलक्या रंगाचे, सैल सुती कपडे घालावेत, जेणेकरून त्यांना मोकळेपणाने श्वास घेता येईल.
- लहान मुलं खूप सक्रिय असतात. त्यामुळे खेळताना किंवा शाळेत जाताना-येताना उष्णतेमुळे त्यांच्या डोळ्यांना त्रास होऊ शकतो. म्हणून मुलांना नेहमी टोपी, छत्री किंवा सुती स्कार्फ सोबत द्या. यामुळे थेट सूर्यप्रकाशामुळे होणाऱ्या उष्माघाताचा धोका कमी होतो.
- दुपारी 12 ते 4 या वेळेत तुमच्या मुलाला उन्हात जाण्यास मनाई करा. तुमचे मूल या वेळेत बाहेर खेळले किंवा जास्त वेळ उन्हात राहिले तर, त्याच्या शरीरातील पाणी कमी होऊ शकते.
- लहान मुले असो वा प्रौढ, प्रत्येकाने दुपारच्या जेवणात शरीराला थंडावा देणारे पदार्थ सेवन करावे जसे की, काकडी, टरबूज, दही, पुदिना आणि इतर हलके पदार्थ शरीराला तीव्र उष्णतेपासून वाचवण्यास मदत करतात.
जंक फूड, तळलेले किंवा भाजलेले पदार्थ खाणे टाळा.



























































