
उत्तर प्रदेशातील बिसलपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली. येथील पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका कालव्यात शुक्रवारी दुपारी दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला. विनीत (21) आणि आशु (24) अशी मृतांची नावे असून ते दोघेही बिसलपूर शहराचे रहिवासी होते. दुपारी पोहण्यासाठी हे दोन्ही मित्र कालव्यावर गेले होते, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांच्यावर काळाने घाला घातला.
पोलीस स्टेशनचे प्रभारी संजीव कुमार शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही मित्र कालव्यात आंघोळ करत असताना अचानक खोल पाण्यात गेले. पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान असल्याने त्यांना स्वतःला सावरता आले नाही. पाण्याचा वेग जास्त असल्याने दोन्ही तरुण प्रवाहाच्या दिशेने वाहून जाऊ लागले आणि काही वेळातच दिसेनासे झाले, अशी माहिती उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र पाण्याच्या वाढलेल्या पातळीमुळे त्यांना यश आले नाही. अखेर स्थानिक डायव्हर्सच्या (पोहोणाऱ्यांच्या) मदतीने शोधमोहीम राबवण्यात आली. काही तासांच्या प्रयत्नांनंतर, घटनास्थळापासून 500 मीटर अंतरावर दोघांचे मृतदेह सापडले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले असून या घटनेमुळे गावात मोठी शोककळा पसरली आहे.




























































