
>> रविप्रकाश कुलकर्णी
पुस्तक ही एक अशी गोष्ट आहे की, एकदा का त्याची गोडी लागली की दिवसेंदिवस त्याची मोहिनी वाढत जाते. यामध्ये सर्वस्वी वेगळा असा एक प्रकार म्हणजे पुस्तक आदानप्रदान सोहळा जो 9 एप्रिल ते 14 एप्रिलदरम्यान पार पडला. डोंबिवलीतील पै फ्रेंड्स लायब्ररीचा हा वेगळा आणि एकमेव उपक्रम म्हणावा लागेल. आपल्याकडील एक पुस्तक द्यायचं आणि त्या बदल्यात तेथे उपलब्ध असलेले पुस्तक घ्यायचं. प्रत्येक पुस्तकामागे दहा रुपये सर्विस चार्ज म्हणून घेतला गेला. दिसायला हे सोपं दिसतं, पण तसं ते नाही त्याचं कारण असा यशस्वी उपक्रम आतापर्यंत फक्त पै यांनाच जमला आहे. भव्य मंडपात वेगवेगळ्या प्रकारची, वेगळ्या रंगाची-ढंगाची पुस्तके चारी बाजूला पसरलेली आहेत आणि वाचनवेडे आपल्याला हवं ते पुस्तक मिळवण्यासाठी भिरभिरती नजर ठेवून आहेत हे दृश्यदेखील मनोरम.
बुक स्ट्रीट म्हणजे वर्षातला एक दिवस रस्त्यावर पुस्तक मांडली जातात आणि तेथे येणाऱयाला त्यातले कोणतेही एक पुस्तक विनामूल्य घेऊन जाता येते. या वर्षी 26 एप्रिलला हा सोहळा डोंबिवली येथे झाला. इथे हेही सांगितले पाहिजे की, पहाटे पाच ते सकाळी दहा एवढीच वेळ मर्यादा या उपक्रमाला होती! तरीदेखील ग्रंथवेडय़ांनी येथे गर्दी केली.
आदानप्रदान उपक्रमातली हकिकत पहा- आपल्याला माहीत नसलेली अनेक पुस्तके इथे होती. त्यात एक दिसलं ‘कळसुत्री बाहुल्या मार्गदर्शिका’ लेखिका- मीना नाईक. मी ते कुतूहलाने चाळलं आणि ठेवलं. कारण माझ्या आवडीचा तो भाग नव्हता, पण काही वेळाने हेच पुस्तक प्रसिद्ध अभ्यासक आणि संपादक राम जगताप याच्या हातात दिसलं. तेव्हा कुतूहलाने मी विचारलं, “तुम्ही हे पुस्तक कसं निवडलंत?”
तेव्हा ते म्हणाले, “सध्या मी विजय तेंडुलकर चरित्र लेखनासाठी सामग्री गोळा करतो आहे. मीना नाईक याचं पुस्तक सहज चाळलं तेव्हा त्यातील अर्पण पत्रिकेकडे लक्ष गेलं, ‘द. ग. गोडसे, विजय तेंडुलकर आणि अशोक रानडे यांनी मला या विषयाकडे वळण्यासाठी प्रवृत्त केलं.’ मला हे माहीत नव्हतं. अर्थात हे मला अभ्यासासाठी उपयुक्त ठरेल. अनायासे मिळालं म्हणून घेतलं.”
या प्रदर्शनात पु. भा. भावे यांची ‘रक्त आणि अश्रू’ व ‘सावरकर नावाची ज्योत’ या पुस्तकाच्या अनेक प्रती दिसल्या. एकेकाळी गाजलेली ही पुस्तके. म्हणून बघितलं 1997 साली प्रकाशित झालेली ही पाचवी आवृत्ती होती. त्याचे प्रकाशक आहेत, देशकेता प्रकाशन. प्रकाशनाचं बोधचिन्ह सावरकरांनी सुचवलेल्या हिंदू राष्ट्र ध्वजाचं आहे आणि प्रकाशनाचा पत्ता आहे – 15, ‘यशोदीप,’ चिदानंद नगर, डोंबिवली (प) 421201. आता शोध घेणे आलं…
असं काय काय कुणाला मिळालं असेल त्याची नोंद तरी होईल का? माझे मित्र अजित पाटणकरही दरवर्षी इथे चक्कर मारतात. त्यांना फक्त हवंय गुरुनाथ नाईक यांचं ‘गुलाम राजा’. जे त्यांना एकदा वाचल्यानंतर परत कुठेच दिसलं नाही. तर अशा वेगवेगळय़ा अनुभवांची नोंद हवी की नाही?
मी सुरुवात केली आहे. इतरांचे अनुभव कळण्यासाठी मी उत्सुक आहे.































































