
निसर्ग अनेकदा आपल्याला थक्क करतो. याचाच एक प्रत्यय इंडोनेशियात आला आहे. इंडोनेशियातील आकाशात रंगाचा एक अद्भुत सोहळा पाहायला मिळाला आहे. याला इंग्रजीत रेनबो क्लाऊड अर्थात इंद्रधनुषी ढग असे म्हणतात. ढगांमागे लपलेले रंगीबेरंगी रंग पाहून हजारो नागरिक निसर्गाच्या या किमयेपुढे आश्चर्यचकित झाले आहेत. याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
व्हायरल झालेला हा व्हिडीओ जोनग्गोल या भागातील असल्याचे सांगितले जात आहे. आकाशात दिसणाऱ्या या रंगीबेरंगी ढगाचा व्हिडीओ लगेच व्हायरल झाला. व्हिडीओमध्ये ढगांच्या काठावर गुलाबी, हिरवा, निळा आणि जांभळा रंगाचे चमकदार थर दिसत होते. अनेकांनी त्याचे वर्णन निसर्गाचा चमत्कार म्हणून केले, तर काहींनी त्यास एआय जनरेटेड व्हिडीओ म्हणून चुकीचे समजले. इंद्रधनुष्य ढग ही एक नैसर्गिक वातावरणीय घटना आहे, ज्याला वैज्ञानिकदृष्टय़ा क्लाऊड इरिडेसीन्स असे म्हणतात. जेव्हा सूर्यप्रकाश अत्यंत लहान आणि जवळ जवळ समान आकाराच्या पाण्याचे थेंब किंवा बर्फाच्या क्रिस्टल्समधून जातो, तेव्हा हे तयार होते. जेव्हा प्रकाश या लहान कणांवर आदळतो, तेव्हा तो वेगवेगळ्या रंगांमध्ये विभागला जातो. या प्रक्रियेस डिफ्रॅक्शन म्हणतात.



























































