शिवसेनेच्या प्रयत्नांना यश; बीआयटी चाळीतील रहिवाशांना दिलासा, पालिकेने हस्तांतरण शुल्कात केली कपात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे मुंबई महापालिकेने आपल्या विविध योजनाअंतर्गत बांधण्यात आलेल्या बीआयटी चाळीसारख्या निवासी-अनिवासी मालमत्तांचे भाडे, अनामत रक्कम तसेच हस्तांतरण शुल्कात कपात केली आहे. याबाबतचे सुधारित परिपत्रक पालिकेच्या मालमत्ता विभागाकडून जारी करण्यात आले आहे. या परिपत्रकामुळे निवासी आणि वारसाहक्काची हस्तांतरण आहेत अशा रहिवाशांना मोठा फायदा होणार आहे.

तब्बल शंभर वर्षे जुन्या असलेल्या दक्षिण मुंबईतील बीआयटी चाळींचा मालकी हक्क मुंबई महापालिकेकडे आहे. गेल्या वर्षी मुंबई महापालिकेने नवीन परिपत्रक काढून घराचे हस्तांतरण शुल्क, अनामत रक्कम, वारसाहक्काने हस्तांतरण शुल्क यात मोठी वाढ केली होती. हस्तांतरणाचा खर्च तीन ते साडेतीन लाख रुपयांपर्यंत पोहोचत असल्यामुळे सदनिका हस्तांतरण करण्यास रहिवासी टाळाटाळ करत होते. त्यामुळे हस्तांतरणाची अनेक प्रकरणे प्रलंबित होती. यासंदर्भात रहिवाशांच्या अनेक तक्रारी शिवसेना उपनेते-आमदार मनोज जामसुतकर यांच्याकडे आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत अनामत रक्कम आणि हस्तांतरण शुल्कात कपात करण्याची मागणी आमदार मनोज जामसुतकर यांनी पालिकेकडे केली होती. अखेर पालिका प्रशासनाने ही मागणी मान्य केली असून मालमत्ता विभागाने नुकतेच सुधारित परिपत्रक जारी केली आहे. सुधारित दर 1 एप्रिल 2026 पासून लागू करण्यात आले आहे.