
>> सोहम पिंगळीकर
[email protected]
प्रत्येक सिनेमाचा आपला ठरलेला प्रेक्षकवर्ग असतो. सिनेमा मोठय़ा शहरात रिलीज होतो आणि माध्यमं बदलत फिरत राहतो. त्यात कधीतरी एखाद्या वेगळ्याच प्रेक्षकाची त्या फिल्मशी गाठ पडते. मग त्याच्यासोबत ती फिल्म नव्या वर्तुळात शिरते, नव्या तऱहेने पाहिली जाते आणि मग हळूहळू तिच्याभोवती एक कल्ट तयार होतो.
शाळेत असताना मी एका सलूनमध्ये कटिंगला जायचो. तिथे नंबर लागायची वाट बघताना टीव्हीवर जे चालू असेल ते पाहावं लागायचं. योगायोग म्हणजे, तिथल्या टीव्हीवर सहसा सलमान खानचा ‘बॉडीगार्ड’ (2011) हा सिनेमा लागलेला असायचा. आज आपण रिल्समध्ये जसं एखादं कथानक तुकडय़ा-तुकडय़ाने पाहतो, तसाच हा सिनेमा मी त्या सलूनमध्ये पाहिला. त्या योगायोगामुळेच हा सिनेमा माझ्या जास्त लक्षात राहिला. आता ‘बॉडीगार्ड’ हा मेनस्ट्रीम सिनेमा आहे, कल्ट नाही; मग या लेखात त्याचं उदाहरण का? कारण भारतात वर्षाकाठी हजारो सिनेमे तयार होतात, पण प्रत्येक सिनेमाचा आपला ठरलेला प्रेक्षकवर्ग असतो. सिनेमा मोठय़ा शहरात रिलीज होतो आणि माध्यमं बदलत फिरत राहतो. त्यात कधीतरी एखाद्या वेगळ्याच प्रेक्षकाची त्या फिल्मशी गाठ पडते. मग त्याच्यासोबत ती फिल्म नव्या वर्तुळात शिरते, नव्या तऱहेने पाहिली जाते आणि मग हळूहळू तिच्याभोवती एक कल्ट तयार होतो.
आतापर्यंत आपण पाहिलं की ‘कल्ट‘ हा सिनेमाचा गुणधर्म नसून प्रेक्षकांच्या वागण्यातून तयार होणारी प्रक्रिया आहे, पण ही प्रक्रिया घडते कशी? केवळ आवड किंवा आठवण पुरेशी नसते. एखादा सिनेमा वेगवेगळ्या मार्गांनी, पुनः पुन्हा, वेगळ्या संदर्भात समोर येतो तेव्हाच तो कल्ट होण्याची शक्यता निर्माण होते.
इथे वितरण (Distribution) आणि प्रसार (Circulation) यांतील फरक महत्त्वाचा ठरतो. वितरण ही आखीव-रेखीव, नियोजित प्रक्रिया असते; पण प्रसार हा विस्कळीत, अनियंत्रित आणि अनेकदा अपघाती असतो. थिएटरमध्ये आपण तिकीट काढून सिनेमा पाहतो; पण केबल, सीडी किंवा पेनड्राइव्हमधून सिनेमा आपल्याला ‘भेटतो’. हा फरक छोटा वाटला तरी निर्णायक आहे. कारण कल्ट सिनेमा अनेकदा अशाच `Uncontrolled encounter’मधून जन्म घेतो. आपण सिनेमाकडे जाण्याऐवजी सिनेमाच आपल्यापर्यंत येतो.
भारतात ही प्रक्रिया अधिक ठळकपणे दिसते. एखादा सिनेमा थिएटरमध्ये अपयशी ठरतो, पण छोटय़ा शहरातल्या सिंगल क्रीनमध्ये चालतो. मोठय़ा शहरातल्या `A सर्किट’मध्ये न टिकलेला सिनेमा गावातल्या `B सर्किट’मध्ये नव्याने सापडतो. एका ठिकाणी ‘फ्लॉप’ ठरलेल्या सिनेमाला दुसऱया ठिकाणी प्रेक्षक मिळतात. अशा फिल्म्सपुढे टुरिंग टॉकीज, व्हिडीओ पार्लर, केबल टीव्ही अशा वेगवेगळ्या मार्गांनी जगत राहतात.
या प्रवासात प्रेक्षकांच्या स्थलांतराचाही मोठा वाटा आहे. उदाहरणार्थ, भोजपुरी सिनेमे हे विशिष्ट प्रादेशिक प्रेक्षकांसाठी बनवले जातात. तरी कामानिमित्त शहरांत आलेल्या प्रेक्षकांसोबत ते नव्या ठिकाणी पोहोचतात. टॅक्सीमध्ये, कामाच्या ठिकाणी, मोबाईलमध्ये हे सिनेमे दिसत राहतात. मग कुठल्या तरी सलूनमध्ये, टपरीवर किंवा रिक्षात हा सिनेमा एखाद्या स्थानिक प्रेक्षकाच्या वाटय़ाला येतो आणि हा प्रेक्षक नव्या दृष्टीने त्याचा आस्वाद घेतो.
पायरेटेड सीडींनी या प्रवासाला खरा वेग दिला. एक हिट सिनेमा आणि त्याच्या जोडीला तीन अनोळखी सिनेमे, या पद्धतीने कितीतरी फ्लॉप फिल्म्स प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्या. बऱयाच वेळा हिट सिनेमांपेक्षा अनपेक्षितपणे सापडलेले फ्लॉप सिनेमेच प्रेक्षकांच्या जास्त लक्षात राहायचे. पुढे पेनड्राइव्ह आणि ब्लूटूथमुळे सिनेमा अक्षरश हातोहात फिरू लागला. अर्थात, प्रत्येक सिनेमा सगळ्या सर्किटमध्ये फिरतो आणि कुठेतरी चालतोच असे नाही. तसंच प्रवास करणारा प्रत्येक सिनेमा कल्ट होईल असंही नाही. पण त्यातल्या त्यात थिएटरमधून उतरल्यावरही स्वतचं स्वतंत्र `Afterlife` असणाऱ्या सिनेमांना ‘कल्ट’ होण्याची जास्त शक्यता असते.
बऱ्याच वेळा थिएटरपासून पेनड्राइव्हपर्यंतच्या या प्रवासात सिनेमाने नव्या प्रेक्षकांसोबत नवा अर्थही कमावलेला असतो. एकेकाळी गंभीर वाटणारा मेलोड्रामॅटिक सिनेमा पुढच्या काळात नकळत कॉमेडी म्हणून पाहिला जाऊ शकतो. तर हलकाफुलका विनोदी सिनेमा नंतर सामाजिक भाष्य म्हणून वाचला जाऊ शकतो. सिनेमा तोच राहिला तरी त्याच्याकडे पाहण्याची पद्धत बदलते. या प्रवासाला भारतीय प्रेक्षणसंस्कृती अत्यंत पूरक ठरते; कारण भारतात वेगवेगळ्या माध्यमांचं सहअस्तित्व आहे. थिएटर, टीव्ही, पायरसी, डिजिटल शेअरिंग या सर्व प्रणाली इथे एकाच वेळी कार्यरत असतात. त्यामुळे एखादी फिल्म ठरवून जतन केली नाही, तरी वेगळ्या वर्तुळात फिरून ती नवा प्रेक्षकवर्ग कमवत राहते. असा सिनेमा आपल्या प्रेक्षकांना अनपेक्षितपणे गाठतो आणि त्यांच्यामार्फत जिवंत राहतो. म्हणूनच कल्ट हा क्षणिक प्रतिसादावर नाही, तर या सततच्या पुनर्भेटींवर आधारित असतो.
आतापर्यंतच्या तीन लेखांमध्ये आपण ‘कल्ट’ समजून घेण्यासाठी प्रेक्षकांचा सहभाग, सबकल्चर, सर्क्युलेशन, प्रेक्षणसंस्कृती अशा काही संकल्पना पाहिल्या. पुढच्या लेखांमध्ये या संकल्पना प्रत्यक्षात कशा लागू होतात हे काही गमतीशीर फिल्म्सच्या उदाहरणातून पाहूया. पण त्याआधी एक प्रश्न उभा राहतो – आज, जेव्हा प्रत्येक सिनेमा आपल्या मोबाईलवर सहज उपलब्ध आहे, तेव्हा हा अपघाती सामना उरतो का? की आता आपणच सिनेमा निवडतो आणि त्याच क्षणी त्याच्या ‘कल्ट’ होण्याचं स्वरूपही बदलतं?
(लेखक चित्रपट समीक्षक, अभ्यासक आहेत)


























































