
>> संध्या शहापुरे
स्वामी विवेकानंदांना एकाने प्रश्न केला , ‘लोक काय मूर्ख आहेत. खुशाल दगडाचा देव बनवून त्याची पूजा करतात. मला तर हे सारे खोटे वाटते. या जगात देवाचे अस्तित्व असल्याचे जाणवत नाही. 33 कोटी देव हे तर थोतांड आहे. देव कुठे दगडाच्या मूर्तीत असतो.’ विवेकानंदांनी इकडे तिकडे पाहिले आणि घराच्या भिंतीवर अडकवलेला फोटो कुणाचा आहे, असे त्यांना विचारले. त्यावर त्यांनी, तो फोटो आपल्या वडिलांचा असल्याचे सांगितले. विवेकानंदांनी तो फोटो काढून जमिनीवर ठेवण्यास सांगितला आणि वर त्याला पायाने ठेचून फोडून टाका असेही सांगितले. त्या व्यक्तीने असे करण्यास नकार दिला .विवेकानंद म्हणाले, ‘अरे तो एक कागद आहे तो फोटो म्हणजे वडील थोडेच आहेत.’ त्या व्यक्तीला यामागचा उद्देश समजला. विवेकानंद म्हणाले, जसे श्रद्धेने तुम्ही या फोटोमध्ये तुमच्या वडिलांना पाहता तसेच प्रत्येक व्यक्ती मूर्तीमध्ये परमेश्वर पाहत असते. त्या मूर्तीमध्ये त्याची अपार श्रद्धा असते. देव कणाकणामध्ये आहे. कुणाला तो मातेच्या चरणात दिसतो, तर कोणाला दीनदुबळ्यांत दिसतो!’ ज्ञानदेव म्हणतात, ‘सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण। ब्रह्मसनातन विठ्ठल हा।।’ तर श्री समर्थ रामदास म्हणतात, ‘जसा भाव तसा देव’ हा अनन्य भक्तीभाव तुमचे रक्षण करतो.



























































