ठसा – माधव पवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> भगवान परळीकर

सोलापूरच्या साहित्य क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व कवी आणि गीतकार माधव रामचंद्र पवार यांचे नुकतेच प्रदीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या अनेक वर्षांपासून ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते. या अत्यंत कठीण काळात जीवनाशी झुंज दिली. किडनीच्या विकारांशी झुंज देत असतानाही त्यांनी आपल्या शब्दातील धार आणि मनातील आनंद कधीच कमी होऊ दिला नाही.

कवी माधव पवार यांनी सोलापूरच्या डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात वरिष्ठ लिपिक म्हणून 35 वर्षे सेवा बजावली. आपल्या कार्यकाळात त्यांनी भांडारपाल, कोषागार, ओपीडी, स्त्री व प्रसूती शास्त्र आणि अॅनाटोमी अशा विविध विभागांमध्ये कार्यक्षमतेने काम पाहिले होते. ते ज्येष्ठ कवी आणि गीतकार रा. ना. पवार यांचे चिरंजीव होत.

साहित्याची ओढ असलेल्या माधव पवार यांचे ‘हे शुभशकुनांचे पक्षी’ आणि ’गरूडभरारी’ हे दोन काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या काव्यप्रतिभेची दखल घेत महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्यासह राज्यस्तरावरील 21 मानाच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. सोलापुरात संपन्न झालेल्या 79 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ‘स्वागत गीत’ लिहिण्याचा बहुमान त्यांना मिळाला होता. अनेक विभागीय आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनांमधील कविसंमेलने त्यांनी आपल्या कवितांनी गाजवली होती.

माधव पवार यांनी लिहिलेली गीते महाराष्ट्रातील नामवंत गायकांनी गायली आहेत. त्यांच्या गीतांच्या अनेक ऑडिओ कॅसेट आणि सीडी प्रकाशित झाल्या आहेत. सुरेश वाडकर, स्वप्निल बांदोडकर, प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे, आदर्श शिंदे, शकुंतला जाधव, जगदीश गोरसे, सुरेखा पुणेकर, बेला सुलाखे यांसारख्या दिग्गज गायकांनी त्यांच्या शब्दांना स्वरसाज चढवला आहे.

एक संवेदनशील कवी, उत्तम वक्ते, नकलाकार, उत्कृष्ट सूत्रसंचालक म्हणून उभ्या महाराष्ट्राला अन् सोलापूरकरांना त्यांची ओळख होती. कवी रा.ना. पवार यांचे सुपुत्र म्हणून ओळखीशिवाय कवी माधव पवार यांच्या प्रतिभेचा नावलौकिक साहित्यदरबारात विशेष होता. ‘हे शुभशकुनांचे पक्षी’ कवितासंग्रहास महाराष्ट्रातील सन्मानाचे 11 पुरस्कार, ‘गरुडभरारी’ काव्यसंग्रह, याशिवाय अनेक नामवंत पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.

वात्रटीकाकार रामदास फुटाणे, कविवर्य फ.मुं. शिंदे, गजलकार सुरेश भटांसह दिग्गजांशी त्यांचा चांगला स्नेहसंबंध होता. मृत्यूलाही साहित्याने जिंकता येते हे त्यांनी आपल्या जगण्यातून दाखवून दिले. सोलापुरातील साहित्य, कला आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान होते.