
त्वचेवरील टॅनिंग दूर करून चेहरा उजळ आणि नितळ दिसण्यासाठी अनेकजण फेस पॅकचा वापर करतात. फेस पॅक त्वचा स्वच्छ ठेवण्यास, अतिरिक्त तेल नियंत्रित करण्यास आणि त्वचेला आर्द्रता देण्यास मदत करतो. मात्र, तो चुकीच्या पद्धतीने वापरल्यास त्वचेला फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते. त्यामुळे फेस पॅक लावताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.
फेस पॅक कसा फायदेशीर ठरतो?
फेस पॅक त्वचेतील अतिरिक्त तेल शोषून घेतो आणि त्वचा स्वच्छ ठेवण्यास मदत करतो. व्हिटॅमिन सी, नियासिनमाइड किंवा चारकोलसारखे घटक असलेले फेस पॅक काळे डाग कमी करण्यास आणि त्वचेचा पोत सुधारण्यास उपयुक्त ठरू शकतात.
जास्त प्रमाणात फेस पॅक लावू नका- अनेकांना वाटते की जाड थर लावल्यास अधिक चांगला परिणाम मिळतो. मात्र, तज्ज्ञांच्या मते जास्त प्रमाणात पॅक लावल्याने त्वचेची छिद्रे बंद होऊ शकतात आणि मुरुमे किंवा पुटकुळ्या येण्याचा धोका वाढतो.
फेस पॅक जास्त वेळ चेहऱ्यावर ठेवणे टाळा- फेस पॅक पूर्णपणे सुकल्यानंतरही तो चेहऱ्यावर तसाच ठेवल्यास त्वचा कोरडी पडू शकते आणि ताणलेली वाटू शकते. साधारणपणे १० मिनिटांपेक्षा जास्त वेळ फेस पॅक ठेवू नये, असा सल्ला त्वचारोग तज्ज्ञ देतात.
त्वचेचा प्रकार ओळखणे आवश्यक- फेस पॅक निवडण्यापूर्वी आपली त्वचा तेलकट, कोरडी की संवेदनशील आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. लिंबूसारखे तीव्र घटक किंवा जास्त एक्सफोलिएशन संवेदनशील त्वचेला त्रासदायक ठरू शकते, तर तेलकट त्वचेवर चुकीचा पॅक वापरल्यास मुरुमांची समस्या वाढू शकते.
दररोज फेस पॅक वापरण्याची चूक करू नका- त्वचा अधिक चमकदार दिसावी म्हणून काहीजण दररोज फेस पॅक लावतात. मात्र, वारंवार वापरामुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होऊन कोरडेपणा वाढू शकतो. त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आठवड्यातून एक किंवा दोन वेळाच फेस पॅक वापरणे योग्य ठरते. त्वचेची योग्य काळजी घेण्यासाठी फेस पॅकचा वापर मर्यादित प्रमाणात आणि आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार करणे अत्यंत गरजेचे आहे.



























































