
वेगाने वाढणारी लोकसंख्या आणि त्याचवेळी निवृत्तीमुळे पालिकेतील घटते मनुष्यबळ यामुळे ठाणे महापालिकेचा कारभार ‘रामभरोसे’ सुरू आहे. जवळपास २५ लाख नागरिकांच्या सेवेसाठी पालिकेकडे अवघे ५ हजार कर्मचारी आहेत. मंजूर पदांच्या तुलनेत निम्म्याहून अधिक पदे रिक्त असल्याने ठाणे महापालिकेत अर्धेच ‘कारभारी’ उरले आहेत. ५ महिन्यांत तब्बल १८२ कर्मचारी आणि अधिकारी सेवानिवृत्त झाले असून त्यामध्ये वर्ग-१ मधील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. होलसेल निवृत्तीमुळे उर्वरित कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण असून अनेक कामेदेखील रखडली आहेत.
१९८२ मध्ये स्थापना झालेली ठाणे महापालिका ‘ब’ वर्गात आहे. महापालिका मुख्यालय, नऊ प्रभाग समिती कार्यालये, रुग्णालये आणि विविध विभागांच्या कामकाजासाठी एकूण १० हजार ८८३ पदे मंजूर आहेत. मात्र यापैकी केवळ ५ हजार ६१६ पदे भरलेली असून तब्बल ५ हजार २५४ पदे रिक्त आहेत. त्यामुळे वर्ग-१, वर्ग-२, वर्ग-३ आणि वर्ग-४ या सर्व संवर्गांमध्ये मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे. दरम्यान तातडीने भरती प्रक्रिया राबवण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. अन्यथा वाढत्या शहराचा कारभार सांभाळणे प्रशासनासाठी दिवसेंदिवस कठीण ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महापालिकेतील सेवानिवृत्तीचे प्रमाण दर महिन्याला वाढत आहे. अवघ्या पाच महिन्यांत १८२ तर जून महिन्याच्या अखेरीस सुमारे ८० कर्मचारी निवृत्त होणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
२०२५ मध्ये ३२० कर्मचाऱ्यांनी सेवामुक्ती घेतली होती. त्यामुळे प्रशासनासमोर नागरिकांना मूलभूत सुविधा प्रभावीपणे पुरवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
अनुभवी कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त जबाबदाऱ्या
अनुकंपा तत्त्वावर किंवा वारसाहक्काने सेवेत दाखल झालेल्या काही कर्मचाऱ्यांमध्ये कामकाजाबाबत अपेक्षित गांभीर्य नसल्याची चर्चा प्रशासनात सुरू आहे. त्यामुळे कार्यक्षम आणि अनुभवी कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त जबाबदाऱ्या येत असून कामाचा ताण अधिक वाढला आहे.
भरतीलाच नक्की ब्रेक कुणी लावला?
ठाणे महापालिकेतील ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील १ हजार ७७३ पदांसाठी ऑगस्ट २०२५ मध्ये एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. नऊ महिन्यांपासून रखडलेल्या ठाणे महापालिकेतील नोकरभरतीचे काय झाले, या भरतीलाच नक्की ब्रेक कुणी लावला, असा सवाल इच्छुक उमेदवारांकडून उपस्थित करण्यात येत आहे.





























































