
श्री शिवाजी ज्ञानपीठ आयोजित ३५३ व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शिवोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात डॉ. हेमंतराजे गायकवाड लिखित ‘शिवाजी महाराज द ग्रेटेस्ट’ या पुस्तकाच्या मोडी लिप्यंतरित हस्तलिखित ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे. हे पुस्तक याआधी इंग्रजी, मराठी, हिंदी आणि कन्नड भाषेत प्रकाशित झाले आहे. या कार्यक्रमाला डॉ. भालचंद्र मुणगेकर, तुळशीदास भोईटे, सुनील पवार, रवींद्र मालुसरे, संदीप सुर्वे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. रविवार, ७ जून रोजी काशीनाथ धुरू हॉल, छबिलदास लेन, दादर पश्चिम येथे सायंकाळी ५ वाजता पुस्तक प्रकाशन होईल.
दादरमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
श्री उद्यान गणेश मंदिर सेवा समितीच्या वतीने दहावीच्या परीक्षेत उत्तम गुण मिळवत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. या सोहळ्यादरम्यान माहीम ते वरळी विभागातील सर्व शाळेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावलेल्या विद्याथ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानसमोरील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात २३ ऑगस्ट रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ६ या कालावधीत हा गुणगौरव सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यात माहीम व वरळीतील ४२ शाळांमधील १५० विद्यार्थ्यांचा अॅटलास स्किलटेक युनिव्हर्सिटीचे कुलगुरू राजन वेलूकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे. या यशस्वी विद्याध्यर्थ्यांना योग्य दिशा मिळावी यासाठी कुलगुरू वेलूकर उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती श्री उद्यान गणेश मंदिर सेवा समितीचे कार्यवाह मधुकर प्रभू यांनी दिली आहे.



























































