
तृणमूल काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत बंडाच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी मंगळवारी भाजप आणि पक्षातील बंडखोर नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला. सत्ताधारी भाजपकडे सर्व केंद्रीय तपास यंत्रणा असू शकतात, मात्र टीएमसीकडे मा, माटी, मानुष आणि पश्चिम बंगालची जनता आहे, असा पलटवार बॅनर्जी यांनी केला आहे. ANI ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
दिल्लीत कल्याण बॅनर्जी आणि पक्षाचे नेते कीर्ती आझाद यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी बॅनर्जी यांनी पक्षाच्या विचारधारेप्रती आपली निष्ठा ठाम असल्याचे म्हटले. तर कीर्ती आझाद यांनी बंडखोर नेत्यांच्या निवडणुकीनंतरच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत त्यांच्यावर जोरदार टीका केली.
पत्रकार परिषदेत बोलताना कल्याण बॅनर्जी म्हणाले, “तुमच्याकडे (भाजप) मुख्यमंत्री, ईडी, सीबीआय आणि इतर सत्ता आहे. पण माझ्याकडे मा, माटी, मानुष, माझा पक्ष, माझे कार्यकर्ते आणि पश्चिम बंगालची जनता आहे.”
दुसरीकडे कीर्ती आझाद यांनी बंडखोरांना थेट गद्दार म्हटले आहे. ते म्हणाले, “आमचे २९ नेते मा, माटी, मानुषच्या नावावर जिंकून खासदार झाले. मला या गद्दारांना विचारायचे आहे की, तुम्ही तुमच्या अडचणी निवडणुकीपूर्वी का सांगितल्या नाहीत? सुखेंदू शेखर रॉय यांनी राजीनामा देऊन किमान राजकीय नैतिकता तरी दाखवली. तुमच्यातही ती नैतिकता असेल, तर तुम्ही सर्वांनी राजीनामे द्यावेत आणि भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढावी.”


























































