
परराष्ट्र खात्याचे माजी सचिव व संवेदनशील कवी राघव मर्ढेकर यांचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 73 वर्षांचे होते. प्रख्यात मराठी कवी, कादंबरीकार आणि समीक्षक बा. सी. मर्ढेकर यांचे ते सुपुत्र होत. राघव यांच्या निधनामुळे एक प्रतिभावंत साहित्यिक व राजनैतिक मुत्सद्दी हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
राघव मर्ढेकर यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1953 रोजी झाला. बा. सी. मर्ढेकर आणि अंजना सयाल यांचे ते एकुलते एक पुत्र होते. राघव फक्त तीन वर्षांचे असताना वडिलांचे निधन झाले. त्यांना वडिलांचा सहवास खूपच कमी मिळाला. मात्र वडिलांचा कवितेचा गुण राघव यांनी उचलला होता. त्यांचा ‘द ट्वेंटी फिप्थ हवर’ हा कवितासंग्रह प्रकाशित झाला होता. राघव मर्ढेकर यांनी हिंदुस्थानसह परदेशात विविध महत्त्वाच्या पदांवर वरिष्ठ अधिकारी म्हणून काम केले होते. 2013 मध्ये ते निवृत्त झाले. त्यांनी आंतरराष्ट्रीय धोरण, सुरक्षा आणि परराष्ट्र विषयांवरही विपुल लेखन केले.
राघव मर्ढेकर हे दिल्लीतील पंजाबी बाग परिसरात वास्तव्यास होते. दिल्लीतील त्यांच्या घरात त्यांनी वडिलांच्या अनेक आठवणी जपून ठेवल्या होत्या. त्यांच्या आई-बाबांनी एकमेकांना लिहिलेली पत्रेही त्यांनी जिवापाड जपून ठेवली होती. साताऱयातील मर्ढे गावातील वडिलांच्या घराचीही काळजी घेतली. देखभाल करणाऱयांसोबत ते नियमित संपर्कात होते. पण स्वतःचं आयुष्य त्यांनी फक्त कुटुंबापुरते मर्यादित ठेवले होते. प्रसिद्धीपासून ते लांब होते.































































