
शस्त्रसंधीमुळे गेले दोन महिने थांबलेले इराण-अमेरिका युद्ध पुन्हा भडकण्याची शक्यता आहे. होर्मुझ सामुद्रधुनीत अमेरिकेने केलेल्या हल्ल्यामुळे नवी ठिणगी पडली आहे. अमेरिकेच्या नौदलाने आज सकाळी हल्ले केल्यानंतर इराणने त्यास जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली आहे. शांतता करार करण्यास इराणने खूप उशीर केला. आता वेळ संपली आहे. कोणत्याही क्षणी इराणमधील ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले होतील, असा इशाराच त्यांनी दिला.
इराणने सोमवारी अमेरिकेचे अपाचे हेलिकॉप्टर पाडले होते. त्याचा बदला म्हणून अमेरिकेने होर्मुझला लागून असलेले बंदर अब्बास या इराणच्या प्रमुख बंदराला लक्ष्य केले. त्याचबरोबर मिनाब, सिरीक, जास्क या ठिकाणांसह केशम बेटांवर हल्ला चढवला. अमेरिकेच्या या हल्ल्याला इराणने तत्काळ प्रत्युत्तर दिले. इराणच्या इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्डने जॉर्डन, कुवेत आणि बहरीनमधील अमेरिकेच्या तळांवर क्षेपणास्त्रs आणि ड्रोनचा मारा केला. स्वसंरक्षणाच्या अधिकाराचा वापर करत आम्ही ही कारवाई केल्याचे इराणने स्पष्ट केले. ताज्या घडामोडींमुळे दोन्ही देशांतील तणाव वाढला आहे.
अमेरिका संयमाची परीक्षा पाहतेय – अराघची
प्रतिहल्ला केल्यानंतर इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी ‘एक्स’ पोस्ट करून अमेरिकेला इशारा दिला. ‘युद्धभूमीवर पराभव होऊनही अमेरिका आमच्या संयमाची परीक्षा पाहत आहे. मात्र, आमचे शक्तिशाली सैन्य कोणत्याही हल्ल्याला वा धमकीला चोख प्रत्युत्तर देतील. जीव वाचवायचा असेल तर आमचा प्रदेश सोडून जा,’ असे अराघची यांनी अमेरिकी सैन्याला ठणकावले.
किंमत मोजावी लागेल – ट्रम्प
‘इराणचे लष्कर पूर्णपणे विस्कळीत आणि कोलमडलेल्या अवस्थेत आहे. त्यांचे नौदल आणि हवाई दल आता नसल्यात जमा आहे. त्यांचा पराभव झाला आहे. इराण फक्त बढाया मारतो आहे. त्यांची ‘दबंग’गिरी संपली आहे. त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकणारा करार करण्यामध्ये त्यांनी खूप वेळ घालवला. आता त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल,’ असा इशारा ट्रम्प यांनी ‘ट्थ सोशल’वरील पोस्टमधून दिला.


























































