
राजापूर शहरात पावसाळ्यात पावसाचे पाणी थेट मुख्य बाजारपेठ परिसरात शिरत असल्याने नागरिकांचे आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होते. या संभाव्य आपत्तीच्या काळात नागरिकांना तातडीने मदत मिळावी, त्यांचे सुरक्षित स्थलांतर करता यावे आणि कोणतीही जीवितहानी किंवा दुर्घटना घडू नये, या उद्देशाने राजापूर नगरपरिषद व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने एका विशेष आपत्कालीन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शहरातील वरची पेठ येथे हे बोटीचे आणि जलतरण (पोहणाऱ्यांचे) प्रत्यक्ष प्रशिक्षण पार पडले. या प्रशिक्षण शिबिराप्रसंगी नगरपरिषदेचे कार्यालयीन अधीक्षक जितेंद्र जाधव, पोलीस निरीक्षक अमित यादव, स्वच्छता निरीक्षक अमित पोवार, सहायक पोलीस निरीक्षक दीपज्योती पाटील व खंडागळे प्रामुख्याने उपस्थित होते. या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष बोट हाताळणीचे आणि पुराच्या पाण्यातून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्याचे तांत्रिक प्रशिक्षण घेतले.
लोकप्रतिनिधी आणि कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग
आपत्ती व्यवस्थापनाचे गांभीर्य ओळखून या प्रशिक्षणात शहरातील लोकप्रतिनिधी, पोलीस दल आणि नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राजापूर प्रशासन हायअलर्टवर असून, पूरस्थिती उद्भवल्यास नागरिकांच्या रक्षणासाठी यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे. या प्रशिक्षणामुळे आपत्कालीन परिस्थितीत वेळेत आणि प्रभावीपणे मदतकार्य करणे शक्य होणार आहे.



























































