लोको पायलटच्या सतर्कतेमुळे मोठा रेल्वे अपघात टळला, हजारो प्रवाशांचे प्राण वाचले; वाचा…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये पुन्हा एकदा ट्रेन रुळावरून घसरवण्याचा धक्कादायक कट रचण्यात आला, मात्र लोको पायलटच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. अमृतसरहून हावडाकडे जाणाऱ्या 13006 पंजाब मेलच्या मार्गात, कॅंट येथील दिलकुशा ब्लॉक हटजवळ शुक्रवारी (19 जून 2026) दुपारी रेल्वे ट्रॅकवर 50 किलो वजनी लोखंडी चौकट ठेवण्यात आली होती. ट्रेन जवळ येत असल्याचे पाहून लोको पायलटने तातडीने इमर्जन्सी ब्रेक लावले. तरीही ट्रेन या चौकटीला धडकली आणि ती इंजिनच्या खाली अडकली. या घटनेनंतर रेल्वे अधिकारी आणि आरपीएफच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत चौकट बाजूला केली. या प्रकरणी कॅंट पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत.

दरम्यान, रेल्वे बोर्डाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 2025-26 या वर्षात ट्रेन रुळावरून घसरण्याच्या 28 घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे, यातील 65 टक्के म्हणजेच 18 घटना अशा ठिकाणी घडल्या जिथे ट्रेन एका ट्रॅकवरून दुसऱ्या ट्रॅकवर जाते, ज्याला ‘टर्नआउट’ किंवा पॉइंट्स आणि क्रॉसिंग्स म्हटले जाते. या पार्श्वभूमीवर रेल्वे बोर्डाने सर्व विभागांना पत्र लिहून ट्रॅकच्या देखभालीकडे आणि प्रलंबित कामांकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या देशभरात अशी 141 कामे 10 वर्षांपेक्षा जास्त काळ रखडलेली असून, ती पूर्ण करण्यासाठी सुमारे 1,334 कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याचे बोर्डाने स्पष्ट केले आहे.