4 जुलै रोजी ‘एशियाटिक’ची निवडणूक; नवमतदारांना वगळले, एकूण 2530 सदस्य करणार मतदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेले अनेक महिने वादात सापडलेली एशियाटिक सोसायटीची निवडणूक अखेर मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. एशियाटिकची निवडणूक शनिवार, 4 जुलै रोजी होणार आहे. मतदान सकाळी 10 ते 4 या कालावधीमध्ये एशियाटिक सोसायटीच्या मुंबईच्या कार्यालयात होईल. 27 सप्टेंबरपर्यंतच्या अर्जदारांना या निवडणुकीत मतदान करता येणार आहे. त्यामुळे फक्त 2530 सदस्य मतदानास पात्र ठरले आहेत.

ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकगठ्ठा झालेल्या सदस्य नोंदणीवरून एशियाटिकची निवडणूक वादाच्या भोवऱ्यात सापडली होती.  आधी धर्मादाय आयुक्त आणि नंतर मुंबई उच्च न्यायालयापर्यंत हे प्रकरण गेले. धर्मादाय आयुक्तांनी निरीक्षक के.डी. तळोकर तसेच नियामक मंडळाच्या पाच सदस्यांची एक उपसमिती नेमली. त्यानंतर एप्रिल महिन्यात यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने निकाल देत स्पष्ट केले की, ऑक्टोबर 2025 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या मतदार यादीनुसारच एशियाटिकची निवडणूक पार पडणार आहे. त्याचबरोबर धर्मादाय आयुक्तांच्या निकालाला स्थगिती देण्यासही उच्च न्यायालयाने नकार दिला. त्यानंतर निवडणूक कामाला सुरुवात होऊन सुधारित मतदार याद्या तयार करण्यात आल्या. 27 सप्टेंबरपर्यंतच्या अर्जदारांना या निवडणुकीत मतदान करता येणार आहे. सुधारित याद्यांवर 15 दिवसांच्या आत हरकती व सूचना संस्था कार्यालयात प्रत्यक्ष द्याव्यात, असे आवाहन समितीने केले होते. ही मुदत आता संपली असून मतदारांची यादी एशियाटिकच्या वेबसाईटवर तसेच सोसायटीच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

दोन पॅनेलमध्ये मुख्य लढत

एशियाटिक सोसायटीच्या 19 जागांसाठी 45 उमेदवार रिंगणात आहेत. ज्येष्ठ पत्रकार, काँग्रेसचे माजी खासदार कुमार केतकर आणि भाजपचे माजी खासदार विनय सहस्रबुद्धे यांच्यात ही निवडणूक रंगणार आहे. काही उमेदवार स्वतंत्र उभे राहिल्याने या तिरंगी लढाईत कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.