महाराष्ट्र हा नादानपणा खपवून घेणार नाही, राडा होईल! संजय राऊत यांचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sanjay-raut-warns-mps-alleges-15-crore-advance-given-by-shinde-faction-maharashtra-politics

साईबाबा, आई वडिलांची, भवानीमातेच्या शपथा घेऊन जे पक्षाशी दगाफटका करत आहेत, त्यांचा नादानपणा आता महाराष्ट्र खपवून घेणार नाही. त्यांना चोख उत्तर जनता देईल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी दिला.

शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) काही खासदार हे एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आज विशेष पत्रकार परिषद घेत दलबदल करू पाहणा-यांना सज्जड इशाराच दिला.

मातोश्रीवर झालेल्या बैठकीत एका खासदाराने तीन मिनिटांत तीनदा साईबाबांची शपथ घेऊन आपण पक्षासोबत एकनिष्ठ राहणार असल्याचे सांगितले होते. इतरही काही जणांनी वेगवेगळ्या शपथा घेतल्या होत्या. मात्र, वैयक्तीक स्वार्थासाठी जर हे लोक पक्षाशी दगाफटका करणार असतील तर महाराष्ट्र हा नादानपणा खपवून घेणार नाही. अशा लफंग्यांना जनता व शिवसैनिक धडा शिकवतील, असा इशारा खा. राऊत यांनी दिला. निवडून आलेले खासदार हे मशाल चिन्हावर व ठाकरेंच्या नावावर निवडून आलेले आहेत, याची आठवणही खा. राऊत यांनी यावेळी करून दिली.

१५ कोटींचा ॲडव्हान्स

पक्षासोबत गद्दारीचा मानस असलेल्या खासदारांना प्रत्येकी १५ कोटींचा ॲडव्हान्स दिला गेला. शिवाय नांदेडवरून प्रायव्हेट फ्लाईटची सेवा दिली गेली, पन्नास कोटींचा जुनाच हमीभाव खासदार खरेदीसाठीही आहे, असा गौप्यस्फोटही खासदार संजय राऊत यांनी यावेळी केला.

बाळासाहेबांनी पुत्रवत प्रेम दिले तरीही..

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला सगळ्यांनाच मुलाप्रमाणे वागवले पुत्रवत प्रेम दिले. उद्धव ठाकरेंनी नेहमीच मोठ्या भावाप्रमाणे प्रेम केले, तरीही ही गद्दारी करावीशी वाटत असेल तर ती शरमेची बाब आहे. खासदारकी आमदारकी येते आणि जाते. निष्ठा महत्वाची आहे. खासदार राजाभाऊ वाजे यांनी ही निष्ठा दाखवली त्याबद्दल त्यांचे कौतुक करतो, असे सांगत खासदार राऊत यांनी वाजे यांच्या पक्षनिष्ठेचा दाखला दिला.

खासदार संजय राऊत यांच्या १५ सफदरजंग लेन या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेला शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते खासदार अनिल देसाई व नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे हे उपस्थित होते.

शिवसेना (उद्धव बाळासेब ठाकरे) हाच अधिकृत पक्ष, अन्य गटाला मान्यता देऊ नये! शिवसेनेचे लोकसभा अध्यक्षांना पत्र

शिवेसना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हाच अधिकृत पक्ष असून, पक्षातील अन्य कोणत्याही खासदाराच्या गटाला मान्यता देऊ नये, तसेच यांसदर्भातील कोणतीही कार्यवाही करण्यापूर्वी शिवसेनेला आपली बाजू मांडण्याची संधी दिली जावी, अशी मागणी करणारे पत्र शिवसेनेने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पाठविले आहे. लोकसभेतील शिवसेना गटनेते खासदार अरविंद सावंत यांनी यासंदर्भात लिहलेल्या पत्रात अनेक कायदेशीर मुद्द्यांचा उहापोह केला आहे.

शिवसेना संसदीय पक्षाची उद्या बैठक

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संसदीय पक्षाची बैठक उद्या (ता.१८) संसदेतील शिवसेनेच्या कार्यालयात होणार आहे. यासंदर्भातील व्हीप पक्षाचे प्रतोद खासदार अनिल देसाई यांनी जारी केला आहे. या बैठकीसाठी पक्षाच्या सर्वच खासदारांना उपस्थित राहणे बंधनकारक असणार आहे.