
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मध्यवर्ती भोजनगृह (रिफेक्टरी) चालविणाऱ्या मे. श्री स्वामी समर्थ भोजनालय अँड केटरिंग सर्व्हिसेसचा अन्न परवाना एफडीएने निलंबित केला आहे. अन्न सुरक्षा विभागाच्या तपासणीत अनेक गंभीर त्रुटी आणि अन्न सुरक्षिततेला बाधा आणणाऱ्या अनियमितता आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली.
अन्न सुरक्षा अधिकाऩयांनी 16 जून रोजी भोजनगृहाची तपासणी केली असता अन्न साठवणूक, तापमान नियंत्रण, स्वच्छता आणि अन्न हाताळणीच्या प्रक्रियेमध्ये गंभीर त्रुटी असल्याचे निदर्शनास आले. तपासणी दरम्यान कच्चे आणि शिजवलेले अन्न वेगळे ठेवण्याबाबत आवश्यक खबरदारी घेतली जात नसल्याचे आढळले. अन्नपदार्थांच्या सुरक्षित साठवणुकीसाठी आवश्यक तापमान नियंत्रणाची प्रभावी व्यवस्था नसल्याचेही स्पष्ट झाले.
अन्न सुरक्षा व मानके (अन्न व्यवसायिकांचे परवाने व नोंदणी) विनियम, 2011 मधील विनियम 2.1.8(4) अंतर्गत मे. श्री स्वामी समर्थ भोजनालय अँड केटरिंग सर्व्हिसेस यांचा परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आला आहे.



























































