
मुंबईचे आद्य शिल्पकार, थोर समाजसुधारक आणि हिंदुस्थानी रेल्वेचे शिल्पकार नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेट यांच्या वडाळ्यातील स्मारकासाठी आज मुंबई महापालिकेने बारा कोटी रुपयांचा निधी स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर केला. त्यामुळे तळ मजल्यासह दोन मजली भव्य स्मारक साकारण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
मुंबई घडवणाऱया नाना शंकरशेट यांचे भव्य स्मारक मुंबईत व्हावे यासाठी शिवसेनेचे तत्कालीन नगरसेवक अॅड. मनमोहन चोणकर यांनी अथक पाठपुरावा केला. शिवसेनेचे तत्कालीन महापौर सुनील प्रभू यांच्या सहकार्यामुळे नानांच्या स्माकाला वडाळ्यात भूखंड मंजूर झाला. या स्मारकासाठी महापालिकेच्या माध्यमातून निधी मिळावा यासाठी नाना शंकरशेट प्रतिष्ठानचा गेल्या अडीच वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. या पाठपुराव्याला अखेर यश आले.
मुंबई महापालिकेची आज स्थायी समितीची सभा झाली. या सभेत 13व्या क्रमांकावर नानांच्या स्मारकासाठी निधी मंजुरीचा विषय ठेवण्यात आला. स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांच्या सूचनेनुसार नानांच्या स्मारकासाठीचा निधी मंजुरीचा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. या वेळी महापालिकेत नाना शंकरशेट प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेंद्रभाऊ शंकरशेट, उपाध्यक्ष दिनकर बायकेरीकर, सरचिटणीस अॅड. मनमोहन चोणकर, कोषाध्यक्ष चंद्रशेखर दाभोळकर व संयुक्त चिटणीस अश्विन उपाध्याय उपस्थित होते. भूखंड आणि निधी दिल्याबद्दल अॅड. मनमोहन चोणकर यांनी पालिकेतील लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे आभार मानले.
असे असेल स्मारक
वडाळा येथील एफ/उत्तर विभागातील भूखंड क्रमांक 3/357वर नाना शंकरशेट यांचे तळमजला अधिक दोन मजल्यांचे भव्य स्मारक लवकरच आकारास येणार आहे. या स्मारकात नानांच्या कार्याची महती सांगणारे भव्य संग्रहालय, देशविदेशातील दस्तावेज ठरणाऱया पुस्तकांचे ग्रंथालय असेल. एक भव्य सेमिनार हॉलही असणार असून अंदमानातील सावरकर स्मारकाप्रमाणेच नानांच्या जीवनावरील महती सांगणारा लाईट अॅण्ड साऊंडचा शोही असेल. उच्च दर्जाचे शैक्षणिक संकुलही या स्मारकात साकारणार असून स्पर्धा परीक्षा, अभियांत्रिकी, वैद्यकीय परीक्षा यासाठी मार्गदर्शन करणारी अद्ययावत दालने या स्मारकात असणार आहेत.




























































