युरोपने हाकललेल्या प्रकल्पाला ठाणे महापालिकेच्या पायघड्या; 24 तास ध्वनिप्रदूषण, तापमानात वाढ होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

युरोपमधून हाकललेल्या अ‍ॅमेझॉन हायपर स्केल डेटा सेंटरला ठाणे पालिकेने पायघड्या घातल्या आहेत. शहराच्या खाडीकिनारी हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. मात्र या प्रकल्पामुळे पाणीटंचाई, २४ तास ध्वनिप्रदूषण, तापमानात वाढ, पर्यावरणीय आणि नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होणार आहे. प्रकल्पामुळे रोजगारनिर्मितीचा दावा केला जात असला तरी नोकऱ्या फक्त ६० जणांना मिळणार असून ६ हजार नागरिकांना याचा त्रास होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाविरोधात ठाणेकरांनी संताप व्यक्त केला असून इतरांच्या फायद्यासाठी आमच्या आरोग्याशी खेळू नका, असे खडेबोल सुनावले आहेत.

अ‍ॅमेझॉन कंपनीने कल्पतरूकडून बाळकुम परिसरात १ हजार ८३० कोटी रुपयात १३० कोटींचे मुद्रांक शुल्क भरून ५४ एकर जमीन खरेदी केली आहे. ठाणे महापालिकेच्या प्रस्तावानुसार येथे मेगा डेटा सेंटर उभारण्यात येणार आहे. ठाणे पालिकेच्या महासभेतील विषय पत्रिकेत हा प्रस्ताव घुसवण्यात आला असला तरी नगरसेवकांना या प्रकल्पाविषयी समजू नये म्हणून गोषवारा दिलेला नाही.

प्रस्ताव तातडीने मागे घ्या

आधीच ३० एमएलडी पाणी कमी येत असल्याची कबुली अर्थसंकल्पात आयुक्तांनी दिलेली असताना ठाण्याच्या वाट्याचे १२ एमएलडी पाणी या डेटा सेंटरला दिले जाणार आहे. हे डेटा सेंटर म्हणजे ठाणेकरांच्या मुळावर उठलेला राक्षस आहे, असा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. तसेच हा प्रस्ताव तातडीने मागे घ्यावा, अशी मागणीही आव्हाड यांनी केली आहे.

नगरसेवकांना गोषवारा का नाही

ठाणेकरांचे पाणी, वीज घेऊन अ‍ॅमेझॉन कंपनी आपल्या सीएसआर फंडामधून ठाण्यात ५० निवारे बांधणार आहे. म्हणजेच या प्रकरणात देवाण-घेवाण झाली असल्याची दाट शक्यता आहे. म्हणूनच महासभेच्या विषय पत्रिकेवर हा विषय आणला असताना गोषवारा मात्र देण्यात आलेला नाही, असा आरोप राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केला आहे.