
जयगड प्रादेशिक नळपाणी योजनेत काम करणाऱे कंत्राटी कर्मचारी गेली सहा वर्ष पगारवाढ मागत आहेत. नुकत्याच झालेल्या बैठकीत कंत्राटदाराने दोन हजार रूपयांची तुटपुंजी पगारवाढ देण्याचे तोंडी आश्वासन दिले. मात्र ही तुटपुंजी पगारवाढ मान्य नसून कामगारांना किमान १५ हजार रुपये तरी पगार मिळाला पाहिजे आणि त्यामागणीसाठी २२ जून रोजी आम्ही आंदोलन करणार असल्याचे खंडाळा पंचक्रोशी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रथमेश गावणकर यांनी सांगितले. या आंदोलनातील कर्मचाऱ्यांना कामावरून काढले तर होणाऱ्या दुष्परिणामांना प्रशासन जबाबदार राहील असा इशारा त्यांनी दिला आहे.
जयगड प्रादेशिक नळपाणी योजनेत १४ कंत्राटी कामगार काम करत असतातदहा वर्ष काम करूनही कंत्राटी कामगारांना १० ते १२ हजार रूपये असा तुटपुंजा पगार मिळतो. याविरोधात २२ जून पासून उपविभागीय कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन छेडणार असल्याचा इशारा प्रथमेश गावणकर यांनी दिला होता. त्यानंतर नुकतीच स्थानिक लोकप्रतिनिधी आणि कंत्राटदार यांची बैठक झाली याबैठकीत दोन हजार रूपये पगार वाढ ऑक्टोबर नंतर देण्याची चर्चा झाली, ती आपल्याला मान्य नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. कर्मचारी आपल्या हक्काचे पैसे मागत आहेत ते मिळण्यासाठी २२ जून रोजी आम्ही आंदोलन करणार आहोत. त्यावेळी जर एखाद्या कर्मचाऱ्याला कामावरून काढले तर पुढे जे परिणाम होतील, त्याला प्रशासन जबाबदार राहील, असे प्रथमेश गावणकर यांनी सांगितले आहे.






























































