
अयोध्येतील राम मंदिरात देणगीच्या रकमेत झालेला घोटाळा आणि चोरीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल म्हणाले की, श्री राम मंदिरातील चोरीमुळे प्रत्येक सनातनी अत्यंत दु:खी आहे. यासोबतच केजरीवाल यांनी येत्या २६ जून रोजी अयोध्येला भेट देऊन रामलल्लाचे दर्शन घेणार असल्याचे म्हटले आहे. ANI ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
सोमवारी एक्स X वर पोस्ट करत केजरीवाल यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आणि आपण शुक्रवारी दर्शन घेण्यासाठी मंदिरात जाणार असल्याची माहिती दिली. राम मंदिरात जमा झालेल्या देणग्या चोरी झाल्याच्या आरोपावरून सध्या देशभरात जोरदार वाद सुरू आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून श्री राम जन्मभूमी मंदिर ट्रस्टच्या विनंतीनंतर, उत्तर प्रदेश सरकारने १४ जून रोजी या घोटाळ्याची सखोल चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय विशेष तपास पथक स्थापन केले आहे. याच तपासाच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी अयोध्याला भेट देणार असल्याचे म्हटले आहे.
या संपूर्ण घटनेवर हनुमानगढी मंदिराचे महंत धर्मदास बाबा यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. हे कृत्य अत्यंत निंदनीय असून यासाठी कोणतीही शिक्षा पुरेशी नसल्याचे सांगत संपूर्ण देश या घटनेचा निषेध करत असल्याचे ते म्हणाले. निष्काळजीपणा किंवा लोभ यापैकी कशामुळेही हे कृत्य घडले असले तरी, त्यामुळे समाजात अत्यंत चुकीचा आणि नकारात्मक संदेश गेल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

























































