
सध्या ICC Women’s Cricket World Cup 2026 चा थरार सुरू आहे. इंग्लंडमध्ये चौकार आणि षटकारांची आतषबाजी सुरू आहे. याच दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने महिला क्रिकेटपटूंसाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. अनेकवेळा गरोदरपणामुळे महिला खेळाडूंना क्रिकेटपासून लांब रहावं लागतं. त्यामुळे त्यांना मैदानावर पुन्हा पुनरागमन करण्यासाठी अनेक महिने किंवा वर्ष वाट पाहावी लागते. मात्र, आता आयसीसीने यावर तोडगा काढत महिला खेळाडूंसाठी ‘पोस्ट-प्रेग्नेंसी कमबैक गाइडलाइन्स’ जाहीर केल्या आहेत. यामुळे आता आई होणे महिला खेळाडूंच्या कारकिर्दीतील अडथळा ठरणार नाही.
आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी यावर बोलताना सांगितले की, कोणत्याही खेळाडूला आई होणे आणि देशाचे प्रतिनिधित्व करणे यापैकी एकाची निवड करण्याची वेळ येऊ नये. यासाठी 16 आठवड्यांचा एक विशेष आराखडा तयार करण्यात आला आहे. या 16 आठवड्यांच्या काळात ही संपूर्ण योजना ‘6R’ मॉडेलवर आधारित असणार आहे. या ‘6R’ मध्ये Ready – तयार होणे, Review – समीक्षा, Restore – रिकव्हरी, Recondition – पुन्हा तंदुरुस्ती मिळवणे, Return – पुनरागमन आणि Refine – सुधारणा या सहा टप्प्यांचा समावेश आहे. या सहा टप्प्यांमध्ये महिला खेळाडूला बाळंतपणानंतर थेट मैदानावर न उतरवता मैदानावर उतरवण्यासाठी हळूहळू तयार केलं जाईळ. या संपूर्ण काळात खेळाडूंच्या शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी डॉक्टर किंवा फिजिओथेरपिस्टची ‘केस मॅनेजर’ म्हणून नियुक्ती केली जाईल, जे खेळाडूच्या रिकव्हरीवर पूर्ण लक्ष ठेवतील. आज तकने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये खेळाडूंच्या सोयीसाठी लवचिक प्रशिक्षण, मुलांची काळजी घेण्याची सुविधा, स्तनपानासाठी स्वतंत्र जागा आणि प्रवासात मदत अशा महत्त्वाच्या शिफारशी करण्यात आल्या आहेत. या नियमावलीच्या निर्मितीमध्ये ऑस्ट्रेलियाच्या टीम डॉक्टर फिलिप्पा इंगे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. वेस्ट इंडिजची क्रिकेटपटू अफी फ्लेचर हिने या निर्णयाचे स्वागत केले असून, यामुळे अनेक महिला खेळाडूंना बाळंतपणानंतर पुन्हा क्रिकेटकडे वळण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
























































