
‘नीट’ परीक्षेच्या उमेदवारांसाठी रविवारी सर्व लोकल फेऱ्या चालवणाऱ्या पश्चिम रेल्वेचे वेळापत्रक सोमवारी दुसऱ्याच दिवशी बोंबलले. सकाळच्या पीक अवर्सला चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकल 15 ते 20 मिनिटे उशिराने धावल्या. त्यामुळे अंधेरी ते बोरिवलीदरम्यान सर्वच स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी उसळली. नोकरदारांना रखडपट्टीचा मनस्ताप सहन करावा लागला. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी लोकल सेवेच्या वेळापत्रकाचा गोंधळ झाल्याने प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाविरुद्ध संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या.
सोमवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल वाहतुकीचे वेळापत्रक कोलमडले होते. बोरिवली आणि विरारहून चर्चगेटच्या दिशेने चाललेल्या लोकल गाड्यांना 15 ते 20 मिनिटांचा विलंब होत होता. गाड्या उशिराने का धावत आहेत, याबाबत रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही उद्घोषणा केली जात नव्हती. त्यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.
सोशल मीडियावर संताप
शहर आणि उपनगरात जोरदार पावसाने हजेरी लावली होती. त्यात आधीच रस्त्यावरील वाहतूककोंडीचा सामना करून रेल्वे स्थानक गाठलेल्या प्रवाशांना पश्चिम रेल्वेच्या विस्कळीत वेळापत्रकाचा मनस्ताप सहन करावा लागला. अनेक प्रवाशांनी पश्चिम रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर सोशल मीडियात संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या. मध्य रेल्वेप्रमाणेच पश्चिम रेल्वेचा वक्तशीरपणा बिघडत चालल्याची नाराजी अनेकांनी व्यक्त केली.



























































