कशेडी घाटात महामार्गावर मातीचा ओसारा ; एकेरी वाहतूक सुरु

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात चोळई नजीक मातीचा ओसारा आल्याने प्रशासनाकडून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. हॉटेल अन्नपूर्णा ते चोळई दरम्यान 2 किलोमीटर अंतरावर एकेरी वाहतूक सुरू आहे. महामार्ग चौपदरीकरणाचे काम करतेवेळी कशेडी घाटातील बहुसंख्य डोंगराचा भाग उभा कापल्या मुळे चोळई हद्दीत दरड कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर भोगाव हद्दीतील जुन्या महामार्गावर खचलेल्या रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी मोठमोठे दगड रस्त्यावर आले असून या ठिकाणी दरड कोसळण्याची टांगती तलवार कायम राहिली आहे. त्यामुळे येथून प्रवास करताना स्थानिक नागरिक व प्रवासी जनतेतून भीती व्यक्त केली जात आहे.

संबंधित महामार्ग प्रशासनाने या ठिकाणी ठोस उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे. अन्यथा दरडीचा भाग खाली कोसळला तर संपूर्ण महामार्ग बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या ठिकाणी खचलेल्या रस्त्याचे काम सुरू असून संबंधित जय भारत ठेकेदार कंपनीकडून जनतेची गैरसोय लक्षात घेऊन तात्पुरत्या स्वरूपात जाण्या येण्यासाठी रस्त्यावर खडी टाकून सोय करण्यात आली आहे. मात्र पावसाळा सुरू होऊ नये सदरचे काम पूर्ण न झाल्याने स्थानिक जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.