
कोरोना काळात जिवाची पर्वा न करता मुंबई निरोगी ठेवण्यासाठी मेहनत घेणाऱया कोरोना योद्धय़ांच्या नोकरीवर गदा येऊ देणार नाही असा पवित्रा म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने घेतला. तसेच, कोरोना योद्धय़ांचे काम काढून घेण्यास व कंत्राटी पद्धतीला जाहीर विरोध केला.
जी उत्तर विभाग कार्यालयात घनकचरा व्यवस्थापन खात्याचे कचरा संकलन व परिवहन विभागाच्या कंत्राट विषयावर बैठक पार पडली. या बैठकीत संदीप जाधव, परिमंडळ-2 संघटक संजय परमार, वार्ड अध्यक्ष अमित लोट, आविष्कार कांबळे, सहाय्यक अभियंता, अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना अध्यक्ष बाबा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली चिटणीस रामचंद्र लिंबारे यांनी घनकचरा व्यवस्थापन खात्याच्या कंत्राटी पद्धतीला विरोध केला. कोरोना काळात जिवाची पर्वा न करता मुंबई निरोगी ठेवण्यासाठी काम करणाऱयांना देवदूत संबोधले. आता त्यांच्या हक्काचे काम काढून घेत आहात हे अत्यंत खेदजनक असल्याचे संघटनेने स्पष्ट केले. महापालिकेने कंत्राटदारांच्या भरवशावर राहण्यापेक्षा स्वतः यंत्रणा उभी करावी, अशी मागणी संघटनेने केली.
संघटनेची मागणी
घनकचरा व्यवस्थापन खात्यातील कामगारांचे मोटर लोडरचे काम बंद करून त्यांना दुसऱया सेक्शनमध्ये हलवण्याची प्रशासनाची योजना आहे. सदर बाब चुकीची असून जर महापालिकेला कंत्राट द्यायचे असेल तर त्यांनी फक्त गाडय़ा पुरवण्याचे काम कंत्राटदाराला द्यावे. महापालिका कामगार मोटर लोडरचे कचरा भरण्याचे काम करतील. त्यांना दुसरे काम देऊ नये, अशी मागणी यावेळी संघानेने केली.


























































